घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपीडित मुलींसह पालकांचे जबाब पूर्ण; आता संस्थेचे विश्वस्थही रडारवर

पीडित मुलींसह पालकांचे जबाब पूर्ण; आता संस्थेचे विश्वस्थही रडारवर

Subscribe

नाशिक : बहुचर्चित द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा अध्यक्ष हर्षल मोरे ऊर्फ सोनू सर याने लैंगिक शोषण केलेल्या सात मुली व त्यांच्या पालकांची जबाब घेतले असून, जबाब नोंदणी पूर्ण झाली आहे. द किंग फाउंडेशनच्या विश्वस्तांना पोलीस चौकशीदरम्यान कागदपत्रे सादर करता आली नसल्याचे समोर आले आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीस मंगळवारी (दि.६) हर्षल मोरे यास न्यायालयात हजर करणार आहेत.

म्हसरूळ शिवारातील मानेनगरमधील ज्ञानदीप आधार आश्रमात हर्षल मोरे याने २०१८ ते २३ नोव्हेंबर २०२२ या काळात मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याने आश्रमातील द्रोण बनविण्याचे मशीन घेतले होते. हे मशीन त्याने वृंदावननगरमधील प्रगती सोसायटीतील रो हाऊस टाईप घरात ठेवले होते. मोरे हा आश्रमातील मुले शाळेतून दुपारी आले की, जेवण करून चार ते पाच मुलांना या मशिन ठेवलेल्या ठिकाणी पाठवत असे. त्यांच्याकडून दररोज मोठ्या प्रमाणावर द्रोण तयार करून घेऊन पंचवटीतील काही मिठाईचे दुकान व द्रोण विक्रेते व्यावसायिकांना विकण्यास पाठवत होता. यात काम करणार्‍या मुलांना व मिठाई विक्री दुकानदारांना हर्षल मोरे सांगत असे की, या व्यवसायातून आलेला पैसा आपल्या संस्थेच्या कामी लागतो. पोलीस तपासात त्याचे आणखी कारनामे समोर येत आहे.

- Advertisement -

तपास अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी पीडित मुलींच्या जबाबांचेही रेकॉर्डिंग पूर्ण केले आहे. पोलिसांनी ज्ञानदीप आधार आश्रम ‘सील’ केला असून, सर्व विद्यार्थिनींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी सटाण्यातील मोरेच्या घरातून एअरगन जप्त केली आहे. ही गन पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवली आहे. शिवाय, सटाणा येथील मोरेच्या घरातील नातेवाइक व शेजारील नागरिकांचीही चौकशी केली. पोलिसांनी द किंग फाउंडेशनच्या विश्वस्तांचीही चौकशी करून जबाब नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र, चौकशीवेळी अत्यावश्यक कागदपत्रे पोलिसांना विश्वस्तांनी सादर केली नाहीत. शिवाय, धर्मादाय आयुक्तांनी द किंग फाउंडेशनची मान्यता रद्द केल्याचे समजते.

राष्ट्रीय बाल आयोग करणार पाहणी

त्र्यंबकेश्वर रोडवरील आधारतीर्थ आश्रमामध्ये चार वर्षीय चिमुकल्या खून आणि म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सात मुलींचे लैंगिक शोषणप्रकरणाची राज्य सरकारपाठोपाठ राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दखल घेतली आहे. या आयोगाचे सदस्य अनू चौधरी व हिमानी नौटियाल बुधवारी (दि.७) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. ते आधारतीर्थ व ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाची पाहणी करणार आहेत. त्या पीडित मुलींशी संवाद साधणार आहेत. अनू चौधरी व हिमानी नौटियाल या बुधवारी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा बाल कल्याण अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेत माहिती घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -