घरताज्या घडामोडीकरोनाचं संकट होळीत जळून खाक होईल!

करोनाचं संकट होळीत जळून खाक होईल!

Subscribe

घाबरू नका, व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार सक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे, मात्र राज्य सरकारने पुरेशी खबरदारी घेतलेली आहे. आपत्तीचा सामना भयभीत होऊन केला तर जे करू नये ते हातून होते. तेव्हा घाबरण्याची आवश्यकता नाही. करोना व्हायरसा सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे. लवकरच होळी सण येत आहे. या होळीत करोनाचे संकट जळून खाक होईल, पण तरीही आवश्यक ती दक्षता घ्या, आणि आवश्यकता नसेल तर गर्दी करणे टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

करोनासंदर्भात सभागृहात विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली. त्यानुसार सर्वपक्षाच्या सदस्यांनी त्यावर आपले विचार मांडले. सर्व सदस्यांनी व्यक्त केलेल्या मताची दखल घेत उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रात देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पण राज्यातील जनतेला यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, करोना प्रतिबंधासाठी लागणारे आवश्यक मास्क, औषधे यांचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकीत हॉटेलमध्ये येणार्‍या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येतात तेथे तपासणीची सोय करण्यात आली आहे. विमानाची साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांनाही पुरेशी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. खासगी रूग्णालयांनाही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यास सांगण्यात आले आहेत. लोकांच्या मनात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या मदतीने जनजागृती करण्यात येणार आहे. लवकरच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आपण घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – चीनमध्ये करोनापासून बचाव करणाऱ्या कारचा शोध

मुंबईसह तीन ठिकाणी व्हायरसच्या तापसणीची व्यवस्था

होळी हा सण आहेच पण त्याचे स्वरूप मर्यादित ठेवले पाहिजे. करोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. त्यासोबतच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तसेच नागपूर येथेही याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे. या प्रश्नी आपण सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले. मास्क लावून फिरू नका, १० ते १५ दिवस काळजी घ्या! महाराष्ट्राच्या जनतेला एकच विनंती करतो की घाबरून जाण्याचे कारण नाही. आपले सरकार दक्ष आहे. आपल्याला काळजी घेण्याची गरज १० ते १५ दिवस आहे. अनावश्यक ठिकाणी गर्दी करणे टाळा. मास्क लावून फिरण्याचे कारण नाही. एन ९५ मास्कचा तुटवडा नाही. पुरेसा साठा आपल्याकडे आहे. पण नागरिकांनी मास्क लावण्याची गरज नाही. केवळ एअरपोर्ट, रुग्णालये या ठिकाणी तपासणी करणार्‍या कर्मचार्‍याला मास्क पुरविण्यात आले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी विधानभवन येथील पत्रकार परिषदेत दिली.

सात व्हायरस माहितीतले, एक नवीन व्हायरस

करोना व्हायरस ग्रुप सात प्रकारचे आहेत. सहा व्हायरस सौम्य, एक प्रकारचा व्हायरस मॉडरेट असून नवीन आलेला प्रकार आहे तो अपरिचित असल्याने त्याला नॉव्हेल करोना व्हायरस हे नाव देण्यात आले आहे. याची लक्षणे ताप, खोकला, स्नायूंचे दुखणे असे आहेत. बाहेरून येणार्‍या नागरिकांत अशी लक्षणे आढळल्यात त्यांची तपासणी केली जात आहे. तपासणी केल्यानंतर महाराष्ट्रातील चारही लॅबमधून चार तासांत त्याचा अहवाल मिळत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याच्या अर्थसंकल्पाला अजितदादांचा बुस्टर डोस?

अवघ्या ३ ते ५ टक्के नागरिकांना उपचाराची गरज

करोना व्हायरस पूर्वी पण होता आज पण आहे. सध्या जरी करोनाची केस आढळली तरी यातील ८२ टक्के रुग्ण हे सामान्य स्वरूपाचे असतात. १५ टक्के रुग्ण सर्वसाधारण स्वरूपाचे असून त्यापैकी केवळ ३ ते ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक आहे त्यांना आजाराचा त्रास होणार नाही, अशी माहिती डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

दररोज १८ हजार परदेशी पर्यटकांची तपासणी

याआधी केवळ १२ देशांतून येणार्‍या पर्यटकांची तपासणी विमानतळावर करण्यात येत होती. मात्र इटलीमधून येणार्‍या प्रवाशांत करोना व्हायरसची लक्षणे आढळल्याने आता सर्वच देशांतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दररोज १८ हजार परदेशी पर्यटकांची तपासणी केली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.

काय काळजी घ्याल?

– मास्कची आवश्यकता नाही. एन ९५ मास्क चिकित्सा अधिकार्‍यांसाठी आवश्यक आहे.
– वारंवार हात धुवायला हवेत. नळाच्या पाण्यात किंवा साध्या साबणाने हात धुतले तरी चालतील. हॅण्ड सॅनिटायझरची आवश्यकता नाही.
– हात मिळवणे टाळा तसेच खोकला असलेल्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवा.
– या विषाणूमध्ये हवेत तीन फुटांपेक्षा जास्त प्रवास करण्याची क्षमता नाही
– रुमालाचा जास्तीत जास्त वापर करावा खोकताना, शिंकताना रुमाल वापरावा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -