घरमहाराष्ट्रकडकsss लॉकडाऊन

कडकsss लॉकडाऊन

Subscribe

आज घोषणा होणार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार संवाद

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने अखेर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याविषयी बुधवारी घोषणा करणार आहेत. कडक लॉकडाऊनमध्ये नक्की काय निर्बंध असतील, या दृष्टीने ठाकरे यांच्या घोषणेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असेल.

लॉकडाऊन किती दिवसांचा जाहीर करायचा, कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, सार्वजनिक वाहतुकीबाबत काय करायचे, गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हा बंदी लागू करायची किंवा कसे? याबाबत चर्चा होऊन मार्गदर्शक सूचना जारी होणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -

मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांचा तुटवडा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करूनही रुग्ण संख्या कमी होत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी केली. या मागणीला उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दाखवली.

 लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही- शेख
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते; पण नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. सध्या ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला असून रुग्णालयात बेड मिळत नाही आहे. या सर्व मुद्यांचा विचार करून शेवटी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

परदेशातून लस खरेदी करणार

राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशातून कोरोना प्रतिबंधित लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. परदेशातून लस खरेदी करण्याची परवानगी मिळाली तर राज्यात १८ ते ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे, कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी निविदा काढण्याची वाट न बघता ठाणे, कोल्हापूरचा आधार घेऊन निर्णय करावा. प्रकल्प उभारण्यात व्यत्यय येऊ नये, दिरंगाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. तर, राज्य सरकारने स्वतःचा ३०० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. हा प्रकल्प कोरोना पश्चातही सरकारच्या उपयोगात येऊ शकतो, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जिल्हाबंदीच्या निर्णयाची शक्यता

कोरोना रुग्णांची मोठी संख्या लक्षात घेता एका जिल्ह्यामधून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी लोकांवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. यामुळे कोरोना प्रसाराला आळा बसेल, असा मुद्दा मंत्रिमंडळात मांडण्यात आला. यावर मंत्र्यांचे एकमत झाल्याचे समजते.

मेडिकल सोडून इतर दुकाने सकाळी ७ ते ११ आजपासून अंमलबजावणी

राज्यभरातील किराणा, भाजीपाला, दूध विक्री आदींची दुकाने बुधवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली राहणार आहेत. राज्य सरकारने मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केला. मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून दुकानांच्या वेळेवर बंधन घालण्यात आले आहे. ते बंधन १ मेपर्यंत लागू राहणार आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लावले आहेत. निर्बंध लादूनही गर्दी कमी होत नसल्याने तसेच नागरिक विनाकारण फिरत असल्याने किराणा दुकानांसह अन्य दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ असा करण्याचा निर्णय सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने मंगळवारी आदेश जारी करण्यात आला.

या आदेशानुसार राज्यातील सर्व किराणा, भाजीपाला विक्रीची दुकाने, फळ दुकाने , दूध, बेकरी, बिस्कीट, चॉकलेटसह सर्व खाद्य दुकाने तसेच मटण, चिकन, पोल्ट्री, मासे आदी कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणार्‍या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.

मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळेच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल, असे आदेशात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -