उत्तर महाराष्ट्रात बनावट दारुचे वाढले प्रमाण; वर्षभरात १७ हजाराहून अधिक प्रकरणे

सुशांत किर्वे । नाशिक

उत्तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस ताडी आणि दारुमधून विषारी रसायने तळीरामांना दिली जात असल्याचे धक्कादायक वास्तव प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) अहवालातून समोर आले आहे. बनावट दारू व ताडी बनविण्यासाठी सर्रासपणे स्पिरीट व कच्चे रसायन वापरले जात आहे. स्पिरीट, अल्कोहोलचे रंग फ्लेवर मिक्स करुन बाटलीत भरून त्यावर लेबल लावून विक्री केल्याची प्रकरणे फॉरेन्सिक लॅबमध्ये दाखल झाली आहेत. हे वेळीच प्रकार थांबले नाही तर उत्तर महाराष्ट्रात रसायनयुक्त दारु प्यायल्याने विषबाधा होण्याची भीती आहे.

नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत येणार्‍या नमुन्यांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील प्रकरणे नाशिकच्या प्रयोगशाळेत दाखल होतात. या विभागात दारुबंदी, उत्पादन शुल्क व मद्यार्क तपासणी असे तीन उपविभाग आहेत. या प्रयोगशाळेत ताडी, बनावट दारू, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या मद्याच्या नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण केले जाते. नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण करत मानवी आरोग्यास धोकादायक असलेले घटक शोधले जातात. त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागास अहवाल दिले जातात. अहवालानुसार संबंधित आरोपींना न्यायालय शिक्षा सुनावते. या विभागात कमी मनुष्यबळात अधिक काम केले जात आहे.

पोलीस अवैध हातभट्टी व दारूअड्ड्यांवर छापा टाकून मद्यसाठा जप्त करतात. शिवाय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक छापा टाकून जप्त केलेल्या मद्यसाठ्यात वापरलेले रसायन कच्चे आहे की पक्के, याची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे केली जाते. त्यानुसार फॉरेन्सिक लॅबमध्ये रासायनिक विश्लेषण करत जप्त केलेला मद्यसाठा बनावट, किती प्रमाणात धोकादायक आहे, याचा अहवाल संबंधित पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागास दिला जातो.
फसवणूक करणार्‍यांवर गुन्हा ः मद्यविक्रेते ग्राहकसंख्या वाढीसाठी वेगवेगळे फंडे वापरतात. बनावट दारू ग्राहकांना विकून पैसे कमावले जातात. दारूची वेगळी चव जाणवल्यास ग्राहकांनी तात्काळ पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करावी. मानवी जिवाला धोका निर्माण झाल्यास संबंधित दारुविक्रेत्यावर फसवणुकीसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो, असे प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले.

घातक रसायनांचा परिणाम

स्पिरीट हे शुद्ध स्वरुपातील इथेनॉल आहे. तर, मिथेनॉल हे प्रचंड विषारी असते. आजही नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी घातक रसायनांचा वापर करुन चोरीछुपे ताडी व बनावट दारू विकली जात आहे. या दारूमुळे शरीरातील साखर आणि पोटॅशिअमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडून माणूस दगावतो. नाशिक शहरात मोठ्या पिशव्या व टायरट्यूबमधून तळीरामांना ताडी दिली जात आहे. हे वेळीच थांबले नाही तर जीवितहानीची शक्यता आहे.

२०२२ मध्ये दाखल प्रकरणे
 • जानेवारी : ९६६
 • फेब्रुवारी : १०७८
 • मार्च : ११२१
 • एप्रिल : १०९५
 • मे : ११५०
 • जून : २११९
 • जुलै : १५७१
 • ऑगस्ट : १६८४
 • सप्टेंबर : २१८४
 • ऑक्टोबर : १२३७
 • नोव्हेंबेर : १७२७
 • डिसेंबर : २१८२