घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकट प्रॅक्टिस ही आरोग्य व्यवस्थेला लागलेली कीड : मंत्री महाजन

कट प्रॅक्टिस ही आरोग्य व्यवस्थेला लागलेली कीड : मंत्री महाजन

Subscribe

नाशिक : डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप समजले जाते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील काही जणांकडून केली जात असलेली कट प्रॅक्टिस ही आरोग्य व्यवस्थेला लागलेली कीड आहे. नवोदित डॉक्टरांनी या प्रकाराला कधीही थारा देवू नये. आपल्या कर्तृत्वाने पुढे जावे. मनात सेवाभाव ठेवावा, असे आवाहन प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता विद्यापीठ मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

महाजन पुढे म्हणाले की, दीक्षांत समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षण असतो. विद्यापीठाची पदवी ही स्वप्नपूर्तीचे साधन आहे. योग्य संवाद व कौशल्याने रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये होणारे वाद टाळण्याचे काम प्रभावीपणे करुन रुग्णसेवा करावी. समाजाचा आनंद हा निरोगी आरोग्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आता फॅमिली डॉक्टर संकल्पना नव्याने राबविण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय विद्यापीठातील कर्मचार्‍यांचे शासनस्तरावर प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

- Advertisement -

कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या की, विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील दीक्षांत समारंभात विद्यापीठाची वाटचाल तंत्रज्ञान व प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. विजन डॉक्युमेंटनुसार विद्यापीठात विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. अवयवदान, रक्तदान जनजागृतीसाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यापीठाचे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी व संशोधन संस्थेत 52 विद्यार्थी प्रवेशित झाले असून, यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढली आहे. सेंटर फॉर एक्सलन्ससाठी विद्यापीठाकडून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. विद्यापीठात परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करुन ऑनलाईन पध्दतीने गुणांकन केले जाते. त्यामुळे निकाल घोषित करण्यासाठी लागणार्‍या वेळेची बचत झाली आहे. तंत्रज्ञानामुळे विद्यापीठातील कामाची गती वाढली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाकरीता चेअर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली असून, संशोधन व तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात येत आहे.

या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय आरोग्य विज्ञान विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन उपस्थित होते. व्यासपीठावर प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अजित गोपछडे, डॉ. सुरेश पाटणकर, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -
96 विद्यार्थ्यांना 124 सुवर्णपदक

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या 12 हजार 727 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील 96 विद्यार्थ्यांना 124 सुवर्णपदक, संशोधन पूर्ण केलेल्या 17 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे २३७, दंत विद्याशाखा पदवीचे २ हजार १०८, आयुर्वेद विद्याशाखेचे ३ हजार ३९२, युनानी विद्याशाखेचे ३३९, होमिओपॅथी विद्याशाखेचे २ हजार १४५, बेसिक बी. एस्सी. नर्सिंगचे १ हजार ९५७, पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे २१३, बी. पी. टी. एच. विद्याशाखेचे १९३, बी.ओ.टी.एच.-२३, बी.पी.ओ. विद्याशाखेचा-१, पदव्युत्तर विद्याशाखेत एम. डी. मेडिकल विद्याशाखेचे-२५७, पी. जी. (दंत)-४८२, पी. जी. आयुर्वेद-४२, पी. जी. होमिओपॅथी-२२७, पी. जी. यूनानी-१, पी.जी.डी. एम. एल. टी.-९१, पॅरामेडिकल- ७१७, पी. जी. अलाईड (तत्सम)-१५८ या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -