घरमहाराष्ट्रदादरा नगर-हवेलीतील यशानंतर शिवसेनेचं सीमोल्लंघन; अन्य राज्यातही निवडणूक लढवणार

दादरा नगर-हवेलीतील यशानंतर शिवसेनेचं सीमोल्लंघन; अन्य राज्यातही निवडणूक लढवणार

Subscribe

युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतील यशानंतर शिवसेना आता इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवणार आहे. याबाबतची माहिती युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

कलाबेन डेलकर यांना पोटनिवडणुकीत एकूण १ लाख १२ हजार ७४१ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना ६३ हजार ३८२ मते मिळाली. डेलकर यांनी गावीत यांचा ४७ हजार ४४७ मतांनी पराभव केला. या विजयाच्या निमित्तानं शिवसेनेनं राज्याबाहेर पहिल्यांदाच निवडणूक जिंकली आहे. या विजयामुळे शिवसेनेचं मनोबल वाढलं आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी इतर राज्यात निवडणूक लढवण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

दादरा नगर-हवेलीमध्ये शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्यायाविरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्रीय नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे, असं पत्रकारांनी विचारलं असता. मुख्यमंत्री वेगवेगळ्या सर्व्हेत टॉप फाईव्हमध्ये येत असतात. मुख्यमंत्री सर्व मित्र पक्ष आणि प्रशासनाला सोबत घेऊन काम करत आहेत, त्यामुळे याचं श्रेय सर्वांचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा राज्याबाहेर पहिलाच खासदार

दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची सूत्रे हातात घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपच्या विरोधात महाराष्ट्राबाहेर एक खासदार निवडून आणतानाच महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच सीमोल्लंघनही केलं आहे.

- Advertisement -

खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर दादरा नगर हवेलीची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोर लावला होता. राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -