ठरलं! कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणारच

Kasaba And Chinchwad By elections | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जंयत पाटलांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

mahavikash aghadi press confference

Kasaba And Chinchwad By elections | मुंबई  – आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा येथील विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या ठिकाणी पोटनिवडणुका (By elections in Kasaba and Chinchwad) लागल्या असून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीकडून लढवण्यात येणार असल्याचे आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जंयत पाटलांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

हेही वाचा -धक्कादायक! अमरावतीत मतमोजणीवेळी मंडल अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक महाविकास आघाडी संयुक्तरित्या लढवणार आहे. या निवडणुकीत कोणाला कोणती जागा द्यायची याबाबत महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाशी सल्लामसलत केली जाईल. पक्षातील वरिष्ठांचा सल्ला घेतला जाईल. त्यानंतर चर्चेअंती निर्णय जाहीर केला जाईल, असं जयंत पाटील म्हणाले. याबाबत उद्यापर्यंत निर्णय जाहीर केला जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आदी भाजपा नेत्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मागणी केली आहे. परंतु, पंढरपूर पोटनिवडणुकीचे उदाहरण देत महाविकास आघाडीने भाजपाला इंगा दाखवला आहे. त्यानुसार, या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केला जाणार असून येथे निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.


अती-तटीच्या ठरलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाचपैकी एकाच मतदारसंघात भाजपाला यश मिळाले. तीन ठिकाणी महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसने निलंबित केलेले नेते सत्यजीत तांबे यांनी अद्यापही त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. एकंदरीतच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याने त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे त्याच उत्साहाने ते चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीला सामोरे जाऊ शकतील. दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या अपयशामुळे दुखावलेले भाजपा आणखी जोमाने पोटनिवडणुकीत उतरून महाविकास आघाडीचा पराभव करू शकतील.