घरक्राइमखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज फैसला! काय होणार?

खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज फैसला! काय होणार?

Subscribe

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते व खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पीएमएलए न्यायालय फैसला सुनवणार आहे. खासदार संजय राऊत यांना ईडीने 30 जून 2022 रोजी अटक केली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना ईडी कोठडीत ठेवण्यात आले होते. तर, 8 ऑगस्ट रोजी पीएमएलए कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे खासदार राऊत यांना आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले. तर, 7 सप्टेंबरला त्यांनी पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. संजय राऊत यांच्या जामीनअर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी झाली. विशेष म्हणजे, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 3 नोव्हेंबरला होणार होती. त्यामुळे त्याआधी त्यांची जामीनावर मुक्तता होते का, याकडे सर्वांचेच लक्ष लागल होते. पण न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आणि तो आज दिला जाणार आहे.

- Advertisement -

सध्या शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. शिंदे गटातील अनेक नेत्यांनी पातळी सोडून टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांना सुनावणीसाठी न्यायालयात घेऊन जाताना किंवा परत आणताना तुरुंगाच्या आवारात किंवा न्यायालय परिसरात माध्यम प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधतात आणि राऊतही अशा घटनांवर प्रतिक्रिया देतात. त्यामुळे संजय राऊत यांना प्रसार माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. आर्थर रोड तुरुंगाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

काय आहे पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा?
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव पत्राचाळींमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना फ्लॅट देण्याची सरकारी योजना आखली. एचडीआयएलची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट म्हाडाला देणार होती. चाळीतील 47 एकर जागेवर हे फ्लॅट्स बांधले जाणार होते, पण गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा म्हाडाला फ्लॅट्स दिले नाहीत. कंपनीने ही जमीन इतर आठ बिल्डर्सना 1034 कोटी रुपयांना विकली. एचडीआयएल कंपनीने केलेल्या या घोटाळ्यांमध्ये प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचा समावेश आहे, असा आरोप आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा मित्र असून, ईडीच्या तपासात त्याचे नाव पुढे आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -