तुम्ही राजीनामा द्या आणि.., केसरकरांचं संजय राऊतांना आव्हान

deepak kesarkar

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील शिंदे गटाचं सरकार आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गटात रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. परंतु शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, संजय राऊतांना काय माहिती आहे, शरद पवार आणि माझे संबंध काय आहेत ते? शरद पवार यांनी मला खूप काही शिकवलं आहे. आयुष्यात आतापर्यंत मी शरद पवार यांच्यावर टीका केली नाही. दोनच व्यक्तींना मी आदर्श मानलं एक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद पवार आहेत. संजय राऊत तुम्ही आमच्या मतांवर खासदार झाले आहात. तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा कोणत्या आमदारांच्या मतांवर निवडून येता तसे या, असं आव्हान दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

एकनाथ शिंदे जरी म्हणाले की, आमचा एकही आमदार मंत्री झाला नाही तरीही आम्ही शिंदेसाहेबांसोबतच आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. फडणवीस यांच्या काळातील काही योजना मागील काही वर्षात बंद पडल्या होत्या. त्या आता पुन्हा सुरु होतील. जलयुक्त शिवार हे फडणवीस यांचं स्वप्न होतं. योजना अंमलात येताना काही चुका होतात. त्याचा दोष प्रमुखावर कसा दिला जाऊ शकतो?, असं केसरकर म्हणाले.


हेही वाचा : जे लोकांना हवे तेच आम्ही करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही