घरताज्या घडामोडीएनसीबीचे समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी

एनसीबीचे समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी

Subscribe

एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात झालेल्या २५ कोटींच्या कथित डील प्रकरणात एनसीबीकडून विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. चौकशीसाठी वानखेडे यांना दिल्लीत बोलावण्यात आलेले असून या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून तीन अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा सौदा १८ कोटीला निश्चित करण्यात आला. त्यापैकी ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा कथित आरोप या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने केला. तसेच त्याने स्वत: एक प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. या प्रतिज्ञापत्राची दखल एनसीबीचे केंद्रात बसलेल्या महासंचालक यांनी घेतली असून याप्रकरणी समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी लावली आहे.

- Advertisement -

समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी दिल्ली येथे एनसीबीच्या मुख्य कार्यालयात होणार असून समीर वानखेडे यांना दिल्ली येथे बोलावण्यात आले आहे. वानखेडे यांच्या चौकशीसाठी एक विशेष दक्षता पथक तयार करण्यात आले असून हे पथक वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या कथित आरोपाची चौकशी करणार आहे.

दरम्यान क्रूझ रेव्ह पार्टी गुन्ह्यावर याचा परिणाम होऊ नये म्हणून एनसीबीचे डीआयजी ज्ञानेश्वर सिंह यांना या प्रकरणात लक्ष देण्यास सांगून दिल्ली येथून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन अधिकार्‍यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

वानखेडेंना हायकोर्टात जाण्याचे निर्देश
एनसीबीने दाखल केलेल्या क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात पुराव्यांशी किंवा तपासात छेडछाड होऊ नये, असा विनंती अर्ज एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी सेशन कोर्टात दाखल केला आहे. मात्र, तुम्ही हायकोर्टात अर्ज दाखल करू शकता, असे निर्देश देत सेशन कोर्टाने वानखेडे यांचा याचिका अर्ज फेटाळून लावला. वानखेडे यांनी त्यांच्याविरुद्ध उठवलेल्या ‘वैयक्तिक आरोपांविरोधात तक्रार करणारे शपथपत्र कोर्टात सादर केले आहे. वानखेडे यांनी स्वतः सोमवारी कोर्टात उपस्थित राहून सांगितले की, त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. वानखेडे यांनी कोर्टाकडे विनंती केली की, या प्रकरणातील साक्षीदार आणि तपासावर कुणालाही प्रभाव पडू देऊ नये. मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी सामोरे जाण्यास तयार आहे. या प्रकारचे प्रतिज्ञापत्र आणि अर्ज दाखल करण्यात आला होता.

तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करू – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील. समीर वानखेडे प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही कारवाई करू, प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र मी पाहिले आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितले होते. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर मीडियाने विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, नवाब मलिक यांची आणि माझी भेट झालेली नाही. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचे म्हणणे समजून घेऊन पुढील कारवाई करू, असे गृहमंत्री म्हणाले. तसेच कारवाई करण्यासाठी कुणीतरी तक्रार दाखल करायला हवी. तशी तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही कारवाई करू, असेही वळसे-पाटलांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा असा वापर कधीही झाला नव्हता. आता जास्त वापर होतोय. सरकार आणि राजकीय व्यक्तींना वेठीला धरले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

दक्षता विभागाकडून जसजशी चौकशी होईल तशी आपणास माहिती देण्यात येईल. समीर वानखेडे पदावर राहणार की नाहीत याबाबत आताच काही सांगता येणार नाही. याबाबत आजच चौकशीचे आदेश आलेले आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती आणि साक्ष यांच्या आधारावर येत्या काळात योग्य तो निर्णय घेण्यात येईल. एनसीबी ही एक पारदर्शक तपास यंत्रणा आहे. चौकशी असू देत नाहीतर तपास असोत आम्ही ती बाब प्रोफेशनली हाताळत असतो. निश्चितपणे एका निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचू.
-ज्ञानेश्वर सिंह, उपमहासंचालक, एनसीबी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -