‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-अस्मानाचा फरक; विरोधक लोकांमध्ये पसरवतायत गैरसमज’

deputy cheif minister ajit pawar reation on wine selling in super market in Maharashtra
'वाईन आणि दारूमध्ये जमीन-अस्मानाचा फरक; विरोधक लोकांमध्ये पसरवतायत गैरसमज'

महाविकास आघाडीच्या सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. पण आज याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला. तसेच विरोधकांचा सरकारला बदनाम आणि सरकारबद्दल लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न चालला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुण्यातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, ‘वाईन आणि दारू यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. अनेक वर्षांपासून आपल्या राज्यातील शेतकरी वेगवेगळे फळांनी वाईन तयार करतात. द्राक्षामधून, काजूमधून वाईन तयार केली जाते. तसेच अनेक प्रकारची फळे आहेत, त्यांच्यापासून वाईन तयार केली जाते. आता आपल्या इथे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी वाईन आपल्या राज्यात खपत नाही. आजूबाजूच्या राज्यांमध्ये खपते. परदेशात निर्यात होते. परदेशात पाण्याच्या ऐवजी वाईन पितात हे सर्वांचं माहित आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्यराष्ट्र अमूक तमूक एवढे त्याला वेगळ्याप्रकारचे महत्त्व दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये तर वाईन घरपोच करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांची त्यांची मागणी होती. पण राज्यातील काही लोकं व्हिडिओ क्लिप काढून सरकारला बदनाम आणि सरकारबद्दल लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.’

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले?

‘वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहीत आहे. तरीही महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला वाईन चढली आहे आणि ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत. राज्यात मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या सुपर मार्केट किंवा स्टोअरमध्ये वाईन विक्रीची मुभा दिल्याने राज्यातील भाजाप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरूळ लागला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार हा निर्णय महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करणारा आहे, असे बोंबलणे म्हणजे स्वतःच्या उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे आहे. सरकारने हा निर्णय घेतला तो शेतकरी, फलोत्पादन करणाऱ्या कष्टकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून, राज्यातील द्राक्ष बागायतदार, वाईन उद्योगास चालना मिळावी म्हणून. त्यात नाक मुरडावे असे काय आहे?,’ असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.


हेही वाचा – Mask Free Maharashtra: महाराष्ट्र मास्कमुक्त मंत्रिमंडळातील निर्णयबाबत अजित पवार म्हणाले…