घरमहाराष्ट्रपवार वडिलांसारखे, त्यांना माझ्या खांद्यावरुन बंदुक चालवायची आहे - फडणवीस

पवार वडिलांसारखे, त्यांना माझ्या खांद्यावरुन बंदुक चालवायची आहे – फडणवीस

Subscribe

मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही," असा टोला फडणवीसांनी पवारांना लगावला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सिनीअरवर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला. देवेंद्र फडणवीस आज कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकलं, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे, असं त्यांनी म्हटलं. पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही,” असा टोला लगावला. “शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील,” अशी कोपरखळी देखील लगावली. “मला असं वाटतंय की माझ्या खांद्यावरून, शरद पवार यांना वांद्र्याच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे. त्यांना सांगायचं आहे की बाबांनो काहीतरी करा…” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीकेची तोफ डागली.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण दौरा केला आहे. “मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,” अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती.


हेही वाचा – केंद्राच्या आदेशानेच म. प्र. कॉंग्रेस सरकार पाडलं; भाजप मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल!

- Advertisement -

कोकणाला साडेसात हजार कोटींचं पॅकेज द्या

राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. चक्रिवादळाने फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे झाडांचा विचार करुन आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल. नुकसानग्रस्तांना १५ हजार रोख द्या, अशी मागणी केली होती, ती सरकारने मान्य केलेली नाही. तसेच भांड्यांसाठीही अत्यंत तोकडी मदत केली आहे, असं फडणवीस म्हणाले. कोकणासाठी किमात सात ते साडेसात हजार कोटींचं पॅकेज द्यावं तरचं कोकण पुन्हा उभारी घेईल,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली. दरम्यान, ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी फडणवीस भेट देणार आहेत. तर १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करुन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -