हे सरकार बनवाबनवी चित्रपटाप्रमाणे, आता देवही पळवायला लागलेत; धनंजय मुंडेंचा घणाघात

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी लवकरच मतदार होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप मैदानात उतरली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते बैठका घेण्याबरोबरच प्रचारातही सहभागी होत आहेत. दरम्यान, हे सरकार बनवाबनवी चित्रपटाप्रमाणे असून आता देवही पळवायला लागलेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

धनंजय मुंडेंनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचा उल्लेख करत हे सरकार अशोक सराफच्या अशी ही बनवाबनवी चित्रपटाप्रमाणे सत्तेत आले आहे. पळवापळवी करून सरकारचा कारभार सुरू असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरचा उल्लेखही त्यांनी केला. आजपर्यंत यांनी उद्योग, आमदार पळवले आता देवही पळवायला लागले आहेत. शिवपुराणात भीमाशंकरचा उल्लेख आढळतो. ते भीमाशंकर आपल्या पुणे जिल्ह्यात आहे. मात्र, ते भीमाशंकर यांनी आसामला नेलं. आमच्या हिंगोली जिल्ह्यातही औंढ नागनाथाच मंदिरही पळवलं. शिवपुराण कोणीही बदलू शकत नाही. भाजपच्या कुठल्याही धर्मवेड्या माणसाने माझ्याशी चर्चा करावी, असं धनंजय मुंडे म्हणाले.

महाराष्ट्राच्या पंढरपूरचा विठ्ठलही उद्या हे गुजरातला नेतील, यावर विधानसभेत प्रश्न विचारल्यावर ते पुन्हा उत्तर देतील. विठ्ठल गेलाय ठिक आहे. आम्ही तरूपती आणून देऊ, असं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील, असं म्हणत शिंदे सरकारवर मुंडेंनी टोलेबाजी केली आहे.


हेही वाचा : निर्बुद्ध लोकांच्या आरोपांवर बोलण्यात अर्थ नाही- देवेंद्र फडणवीस