हिरकणी कक्षात सुविधांची वानवा, पाणावलेल्या डोळ्यांनी आमदार मातेचा सरकारवर संताप

Hirkani Room in Vidhanbhavan | महिला सदस्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात त्या गेल्या. मात्र, त्या कक्षाची अवस्था पाहून सरोज अहिरे यांच्या डोळ्यांत पाणी आले. बाळाची सुरक्षा लक्षात घेता त्यांनी विधानभवनातून काढता पाय घेतला आणि प्रसारमाध्यमांसमोर येत हिरकणी कक्षाच्या दूरवस्थेची माहिती कथन केली.

saroj ahire

Hirkani Room in Vidhanbhavan | मुंबई – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मतदारसंघातील सर्व आमदार या अधिवेशनाला हजर आहेत. आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याकरता आणि निधी मिळण्याकरता आमदार अधिवेशनाला येत असतात. आमदार सरोज अहिरे-वाघ सुद्धा आपल्या पाच महिन्याच्या आजारी बाळाला घेऊन आज विधानभवनात दाखल झाल्या. महिला सदस्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात त्या गेल्या. मात्र, त्या कक्षाची अवस्था पाहून सरोज अहिरे यांच्या डोळ्यांत पाणी आले. बाळाची सुरक्षा लक्षात घेता त्यांनी विधानभवनातून काढता पाय घेतला आणि प्रसारमाध्यमांसमोर येत हिरकणी कक्षातील सुविधांची वानवा असल्याची माहिती कथन केली.

हेही वाचा – बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

राष्ट्रावादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हिरकणी कक्षाच्या दूरवस्थेचा एक व्हिडीओ ट्वीटद्वारे शेअर केला आहे. तसंच, आमदार सरोज अहिरे यांनीही हिरकणी कक्षातील परिस्थिती माध्यमांसमोर कथन केली. “माझ्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याकरता मी आज येथे आले आहे. माझं पाच महिन्यांचं बाळ आजारी असतानाही मी येथे आले. परंतु, हिरकणी कक्षाची अवस्था पाहता आज मी येथून बाहेर पडत आहे. सरकारने जर सुयोग्य हिरकणी कक्षाची व्यवस्था नाही केली तर मी उद्याच माझ्या मतदारसंघात परत जाणार आहे. अशा अवस्थेत मी माझ्या बाळाला ठेवू शकत नाही,” असं सरोज अहिरे म्हणाल्या.


तसंच, “सरकारच्या झोळीत काही काळ माझं बाळ ठेवून मी माझ्या मतदारसंघासाठी सभागृहात जाणार होते. मतदारसंघाचे प्रश्न मांडणार होते. मात्र, हिरकणी कक्षाची अवस्था पाहता मला राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यानही सभागृहात जाता आलं नाही. माझ्या बाळाला माझी जेवढी गरज आहे तेव्हढीच माझ्या मतदारसंघालाही आहे. परंतु, सरकार माझं बाळ सांभाळू शकत नाही. हे सरकार महिलांच्या समस्या समजू शकत नाही. आजची परिस्थिती पाहून मी आज तात्पुरती चालली आहे. परंतु, उद्यापर्यंत सरकारने हिरकणी कक्षात व्यवस्था केली नाही तर मी उद्या माझ्या घरी परतणार आहे,” असं सरोज अहिर म्हणाल्या.


हिवाळी अधिवेशनात हिरकणी कक्ष स्थापन करून सरकारने पाठ थोपटून घेतली. पण मुंबईतील विधानभवनात असलेल्या हिरकणी कक्षात साधा पाळणाही नाही. सावित्रींच्या बाळांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी कोणी घ्यायचीय़ असा प्रश्न विचारत अशी नमकहरामी गोष्ट कितीवेळ करणार आहात? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार कसाबपेक्षाही निर्दयी आहे. यांच्यापेक्षा कसाब बरा असा संतापही मिटकरी यांनी व्यक्त केला.