Covid Mask: वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क टाळा; N-95 मास्क वापरा – अजित पवार

वेगवेगळ्या डिझाईनचे मास्क निरुपयोगी असून एन-९५ मास्क वापरा असा सल्ला अजित पवार यांनी दिला

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणते मास्क घालणे टाळावे आणि कोणते मास्क घालावे याबाबत आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

पुण्यातील कोरोनाची आढावा बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये अजित पवार म्हणाले की, ‘वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क किंवा दोन स्तर असलेले सर्जिकल मास्क वापरण्याची ऐवजी तीन स्तर असलेले सर्जिकल डबल मास्क किंवा एन ९५ मास्क हे प्रत्येकाने वापरले पाहिजेत. डॉक्टरांच्या मते साध्या मास्कचा ऐवढा उपयोग होत नाही. काही काहीतर वेगवेगळ्या डिझाईनचे मास्क वापरतात त्याचातर काहीच उपयोग नाही, असे स्पष्टपणे सगळ्यांनी लक्षात आणून दिले आहे. त्याच्यामुळे याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. म्हणायला मास्क कसेही वापरून चालणार नाही. थ्री लेअर सर्जिकल मास्क किंवा एन ९५ अशाच पद्धतीचे मास्क वापरले पाहिजेत.’

तसेच उद्यापासून पुण्यात मास्क नसल्यास ५०० रुपये तर थुंकल्यास १००० रुपये दंड आकारणार असल्याचे अजित पवार  म्हणाले. पुणे शहरात साधारण पॉझिटिव्हचा दर १८ टक्क्यांपर्यंत गेलेला आहे. ज्यावेळेस १८ टक्क्यांवर पॉझिटिव्हिटीचा रेट जातो, त्यावेळी निश्चितपणे काळजी करण्याचा प्रश्न निर्माण होतो. ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. पुढील ३० ते ४५ दिवसात रूग्ण संख्येचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या ऐकीव बातम्या आहेत. पण १०५ देशात ओमिक्रॉनचा आजच्या घडीला प्रसार झालेला आहे. आपल्या देशाबाबत बोलायचे झाल्यास २३ राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात ११ ठिकाणी ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पुणे शहरात ३ हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी ८८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत आणि ३६ रुग्ण व्हेंटिलेटर्सवर आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


हेही वाचा – Maharashtra Corona: टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू नका!; अजित पवारांचा इशारा