घरमहाराष्ट्रदुचाकीस्वार धुळीच्या विळख्यात !

दुचाकीस्वार धुळीच्या विळख्यात !

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाची दैना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास खडतर झालेला असताना त्यात धुळीचे साम्राज्य पसरल्याने हा प्रवास अधिकच खडतर होऊन बसला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावर प्रवास करणे नकोसे झाले असून, प्रवास पूर्ण होईपर्यंत त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

या महामार्गावरील वाहतूक कोंडी, खड्डे, अपघात हा नेहमी चर्चेचा विषय असून, अद्यापही तेथून होणारा प्रवास होडीतील प्रवास वाटत असतो. परंतु होडीत बसल्यानंतर मनाला आनंद देणारे पाण्याचे तुषार निदान अंगावर उडतात, मात्र महामार्गावरुन प्रवास करताना धुळीचे लोट अंगावर घ्यावे लागत आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ चौपदरीकरणाचे भजं घालून ठेवल्यामुळे वाहनांचा आणि पर्यायाने प्रवाशांचा प्रवास कमालीचा कष्टप्रद झाला आहे. मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांतून आता माती वर आली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे खड्डे बुजविण्याचे काम कूर्मगतीने सुरू आहे. सायंकाळच्या पावसानंतर दिवसा रखरखीत ऊन पडत असल्यामुळे संपूर्ण माती सुकत असल्याने खड्डे बुजविण्यासाठी खडी, माती यांचा वापर केला जात असून, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. त्यासाठी बारीक ग्रीट वापरली जात आहे. तसेच काही ठिकाणी डांबर-खडी टाकून खड्डे बुजविले जात असले तरी त्यावरही बारीक ग्रीट टाकली जात असल्याने त्यावरून वाहने गेल्याने ती हवेत उडत असते. महामार्गावरील वडखळ ते पेणपर्यंतचा टापू पूर्णपणे उखडून गेल्याने खड्ड्यांमधून माती वर आली असून, वाहनांच्या वर्दळीमुळे प्रचंड प्रमाणात धुरळा उडत आहे.

या धुरळ्यामुळे अनेकदा वाहनचालकाला समोरचे वाहन चटकन नजरेस पडत नाहीत. त्यामुळे अपघाताचीही टांगती तलवार असते. रात्रीच्या वेळी तर वाहन चालविणे धोकादायक ठरत असून, लहान वाहने तर बर्‍याचदा काचेवर पाणी उडवून वायपरचा वापर करताना दिसतात. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यामुळे शेकडो कार्यकर्ते दुचाकींचा वापर करीत असून, त्याचा परिणाम महामार्गावरील वाहनांची संख्या वाढण्यात झाली आहे. या धुरळ्यामुळे दमा, खोकला, घसा धरणे अशा व्याधी बळावत असल्याच्या तक्रारी विशेषतः दुचाकीस्वारांकडून वाढू लागल्या आहेत.
महामार्गावरील खड्डे आणि उडणार्‍या धुरळ्यामुळे दुचाकी चालविणे अवघड होत आहे. धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले असून श्वसनाचे विकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंगावरील कपड्यांची साफ दैना होत असते.
-काशिनाथ म्हात्रे, दुचाकीस्वार

- Advertisement -

महामार्गावर प्रचंड धुळीचे लोट उठत असल्याने समोरचे वाहन दिसत नाही. रात्रीच्या वेळी मोटरसायकलसारखे वाहन चटकन दिसत नसल्याने वाहन जपून चालवावे लागत आहे.
-दिगंबर पाटील, वाहनचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -