अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार? बुधवारी होणार निर्णय

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या आरोपांमुळे मलिक आणि देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज करून राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी परवानगी मागितली आहे. या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे.

ncp-nawab-malik and anil deshmukh

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांना राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) मतदान (voting) करता येणार किंवा कसे, याचा निर्णय बुधवारी (८ जून) होणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या आरोपांमुळे मलिक आणि देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) आहेत. या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज करून राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी परवानगी मागितली आहे. या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर बुधवारपर्यत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने  ईडीला दिले आहेत. येत्या ८ जूनला  यावर सुनावणी आहे.

राज्यसभेसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. एकूण 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेना आणि भाजपची मदार अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांवर आहे. या निवडणूकीत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी  न्यायालयात अर्ज दाखल केले होते.  हे दोघे राष्ट्रवादीचे आमदार असून त्यांना राज्यसभा निवडणुकीत  मतदानाचा हक्क बजावायचा आहे.