थोरात आणि वडिलांशी चर्चा करूनच उमेदवारीचा अंतिम निर्णय; सत्यजित तांबेंनी सांगितली ‘आपबिती’

अशा पद्धतीची चर्चा आमच्या सगळ्या परिवारात झाली आणि आम्ही तशा पद्धतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवला, असं म्हणत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे

मुंबईः वडिलांच्या जागेवर उभं राहावं असं माझं मत नव्हतं. मला स्वतःचं काही तरी निर्माण करायचं असल्यामुळे मी सुरुवातीला त्यांना नाही बोललो. नंतर आम्ही घरात चर्चा केली, थोरात साहेब होते, माझे वडील होते. मी होतो आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर सगळ्यांनी असं ठरवलं की सत्यजितला आपण लढवू या. अशा पद्धतीची चर्चा आमच्या सगळ्या परिवारात झाली आणि आम्ही तशा पद्धतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवला, असं म्हणत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजित तांबेंनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे, त्यावेळी ते बोलत होते.

निवडणूक लढवण्याची माझी पूर्णतः मानसिक तयारी झालेली नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं की, शेवटच्या क्षणाला हा निर्णय घेऊ, सत्यजित लढेल की डॉ. सुधीर तांबे लढतील हा निर्णय आम्ही शेवटच्या क्षणाला घेऊ, आधी कोणाची उमेदवारी जाहीर करू नका, असं मी स्वतः भेटून एच के पाटील साहेबांना सांगितलं. माझ्या वडिलांनीही एच. के. पाटील साहेबांना तसं सांगितलं. त्याचं कारण म्हणजे विधान परिषदेच्या उमेदवाऱ्या ह्या दिल्लीतून ठरत असतात. या मुंबईत ठरत नसतात. काँग्रेसमध्ये असलेल्या कामाच्या पद्धतीनुसार प्रभारी जे असतात, तेच कामाचं बघत असतात. म्हणून आम्ही प्रभारींच्याच संपर्कात जास्त होतो. त्यांच्याच कानावर आम्ही सगळ्या गोष्टी घालत होतो. निवडणुकीच्या दोन-तीन दिवस आधीसुद्धा एच. के. पाटील यांच्याशी आमची चर्चा झाली. कशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं करायचं आहे. तेव्हा त्यांनी मान्य केलं की शेवटच्या क्षणाला आपण निर्णय घेऊ, काही अडचण नाही, असंही एच के पाटील म्हणाल्याचं सत्यजित तांबेंनी सांगितलंय.

आम्ही तुमच्याकडे कोरा एबी फॉर्म पाठवून देतो. त्यापद्धतीनं कोणाला निवडणूक लढवायची आहे, तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. हे सगळं झाल्यानंतर निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आल्यानंतर त्या दिवशी सकाळी माझी एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. दोन दिवस आधी म्हणजेच 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून आम्ही प्रदेश कार्यालयाशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की माणूस नागपूरला पाठवा. माझा माणूस 10 तारखेला सकाळी नागपूरला पोहोचला. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं तिथे तो पोहोचला. 10 जानेवारीला सकाळपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझा माणूस बसून राहिला. तब्बल 10 तास त्या ठिकाणी बसून राहिला. बसून राहिल्यानंतर नाना पटोलेंचा वडिलांना फोन आला आणि एबी फॉर्म देत असल्याचं सांगितलं. तेव्हा माझा माणूस दोन एबी फॉर्म घेऊन निघाला. एबी फॉर्म म्हणजे ते काही ग्रामपंचायत निवडणुकीचे एबी फॉर्म नाहीत. त्यामुळे ते सीलबंद पॉकीटमध्ये प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आले. 10 तारखेला संध्याकाळी निघाल्यानंतर तो 11 तारखेला सकाळी पोहोचला. 11 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली कारण 12 तारीख शेवट होती. फॉर्मचा सील फोडल्यानंतर ते दोन्ही एबी फॉर्म चुकीचे असल्याचं लक्षात आलं, तसेच ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे एबी फॉर्म नसल्याचीही धक्कादायक माहिती समजली. एक औरंगाबाद शिक्षण मतदारसंघाचा एबी फॉर्म आहे आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म आहे. इतका गहाळपणा प्रदेश कार्यालयाने का केला हा माझा मुद्दा आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.