Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पुण्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे रॅकेट, बनावट 'CMO अधिकाऱ्या'चा शिक्षण संस्थांना गंडा

मुख्यमंत्र्यांच्या नावाने पुण्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे रॅकेट, बनावट ‘CMO अधिकाऱ्या’चा शिक्षण संस्थांना गंडा

Subscribe

सीएमओसह आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावानेही पुण्यातील शिक्षण संस्थांना फोन केल्याचे उघडकीस आले असून हे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पिंपरी चिंचवड (पुणे) – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नावाने आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून गंडा घालणारा भामटा पकडला गेल्यानंतर आता महाराष्ट्रात आणखी एक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी (OSD to CMO) असल्याचे सांगून एकाने पुण्यातील महत्त्वाच्या पाचहून अधिक शैक्षणिक संस्थांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात विद्यार्थ्यांना नामवंत महाविद्यालयात प्रवेश देतो असे सांगत त्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर सीएमओच्या नावाने अॅडमिशन करण्यास सांगून दबाव आणला जात होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलिस स्थानकात सीएमओकडूनच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सीएमओसह आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावानेही पुण्यातील शिक्षण संस्थांना फोन केल्याचे उघडकीस आले असून हे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे.

- Advertisement -

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय चौबे या प्रकरणात जातीने लक्ष्य घालून आहेत. राहुल पलांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस, डीवाय पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, तानाजी सावंत यांचे जयवंत प्रसारक शिक्षण मंडळ याशिवाय पुण्यातील नामवंत महाविद्यालांमध्ये प्रवेश मिळवून देतो, त्यासाठी लाखो रुपयांची मागणी केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

केवळ एमबीए, विधी महाविद्यालयांमध्येच नाही तर वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही प्रवेश मिळवून देण्यासाठी राहुल पलांडे याने स्थानिक आमदार, खासदार यांचे नाव घेऊन, त्यांचे लेटर हेड वापरुन अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देत अॅडमिशन पोटी लाखो रुपये उकळल्याचे खात्रीलायरित्या समजते आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) असल्याचे सांगून एका भामट्याने पुण्याच्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि आणखी चार शैक्षणिक संस्थेत CMO च्या कथित विनंतीवरुन चार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि आणखी काही शिक्षण संस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत CMO च्या कथित विनंतीवरुन प्रतिष्ठीत सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ग्रुपच्या (SIBM) पुणे, लव्हाळे, हिंजवडी आणि बंगळुरु येथील महाविद्यालयांमध्ये चार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले, आणि हा घोटाळा उघड झाल्याचे समजते.
शिक्षण संस्थांच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी सीएमओमध्ये काम करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे मोबाइल स्क्रीनशॉट दाखवले आणि “मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रवेश मागितला” असल्याचे उघड झाले.

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रवेश मिळवून देणाऱ्या व्यक्तीविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील नितीन यू. पानसरे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल राजेंद्र पलांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोण आहे प्रवेश मिळवून देणारा ‘गुरु’
पानसरे यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता राहुल राजेंद्र पलांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पलांडे (वय – ३१)  हा दर्शनगिरी बिल्डिंग, केशवनगर, पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. राहुल पलांडेने पुणे आणि बंगळुरु येथील अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याच्या नावाने लाखोंचा गंडा घातला आहे.

राहुल पलांडेच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो अपलडो करण्यात आलेले आहेत. ज्या मोबाईल नंबरवरुन शिक्षण संस्थांच्या अधिकारी, प्राचार्यांना फोन करण्यात आले, तो नंबर तपासण्यात आला तर त्याचा सीएमओशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले. या सर्व खुलाशांमुळे सीएमओतील अधिकारी गोंधळून गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. प्रवेश घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

राहुल पलांडेची अॅडमशनची मोडस ऑप्रेंडी
राहुल पलांडे याच्या फेसबुक पेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांसोबतचे फोटो आहेत. पलांडेकडे तीन ते चार मोबाईल असून त्याने ट्रू कॉलरवर ‘सीएमओ ऑफिस, महाराष्ट्र शासन, मुंबई’ असे नाव सेव्ह केलेले आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला फोन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याचे वाटत होते.
तसेच त्याने व्हॉट्सअॅप डीपी म्हणून शासनाचे बोधचिन्ह तीन सिंहाचा फोटो ठेवलेला आहे. यामुळे तो कोणी सरकारी अधिकारीच असल्याचे त्याच्या प्रत्येक कृतीतून भासवत होता.

- Advertisment -