…यांना लवकरच ‘शिल्लक यात्रा’काढावी लागणार, गजानन काळेंची आदित्य ठाकरेंवर टीका

gajanan kale

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे गट-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. परंतु शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुबंई आणि मीरा-भाईंदर येथील माजी नगरसेविकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगलाच दणका बसला आहे. परंतु पक्षातील गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. दरम्यान, आता यांना लवकरच ‘शिल्लक यात्रा’काढावी लागणार, अशी खोचक टीका मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

काय म्हणाले गजानन काळे?

छोटे नवाब यांच्या ‘निष्ठा यात्रेचे’तर उलटे परिणाम दिसू लागलेत. आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले. आता यांना लवकरच ‘शिल्लक यात्रा’काढावी लागणार असं दिसतंय, असं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य मुंबई महानगरपालिका असून ते मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून आदित्य ठाकरे शिवसेनेच्या २३६ शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणार आहेत.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा काढली असली तरी शिवसेनेमध्ये दररोज फुट पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आता अॅक्शन मोडवर आले असून मातोश्री आणि शिवसेना भवनात जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सातत्याने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, गजानन काळे यांच्या या ट्विटनंतर आदित्य ठाकरे पलटवार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : हॅरिस पुलाखाली पाण्यात अडकली विंग कमांडर मराठे कुटुंबीयांची कार, सुटका करण्यात यश