घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबोनमॅरो दान देत बहिणीकडून भावाला रक्षाबंधनानिमित्त जीवदानाची भेट

बोनमॅरो दान देत बहिणीकडून भावाला रक्षाबंधनानिमित्त जीवदानाची भेट

Subscribe

नाशिक : रक्षाबंधनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शहरातील एका बहिणीने आजाराने पिडीत भावाला बोनमॅरो (स्टेमसेल्स) दान करत अनोखी भेट दिली. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेला हा तरुण औषधनिर्माण (फार्मसी) शाखेत शिक्षण घेत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अधून-मधून थंडी-ताप, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा यांसारख्या लक्षणांनी तो आजारी होता. औषधनिर्माणाचा अभ्यास करत असल्याने आपले हे दुखणे नेहमीचे आजारपण नसल्याचे त्याला लगेच जाणवले. त्याने ही बाब त्याच्या पालकांना सांगितली. त्यानंतर या कुटुंबाने नामको हॉस्पिटलमधील तज्ज्ञ हिमॅटोलॉजिस्ट डॉ. सिध्देश कलंत्री यांची भेट घेतली. डॉ. कलंत्री यांनी रक्ताच्या विविध तपासण्या करुन तरुणाला ’अप्लास्टिक अ‍ॅनेमिया’ (शरीरातील बोनमॅरो अकार्यक्षम होणे) हा गंभीर आजार झाला असल्याचे निदान केले व पुढील उपचारासाठी त्याला नामको हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

नामको हॉस्पिटलमधील अद्ययावत हिमॅटॉलॉजी व बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभागात डॉ. सिध्देश कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी स्टेमसेल्स (मूलपेशी) दात्याचा शोध सुरू झाला. त्याच्या दोन्हीही बहिणींनी स्टेमसेल देण्याची तयारी दाखवली मात्र, लहान बहिणीच्या मूलपेशी भावाच्या शरीराशी जुळत असल्याने तिची डोनर म्हणून निश्चिती झाली.

२४ जुलैला दाखल झाल्यानंतर पहिल्या सहा दिवसांत तरुणाच्या शरीरातील रक्तघटकांना केमोथेरेपी देऊन नष्ट करण्यात आले. त्यासाठी हेपा फिल्टर्स असलेल्या अत्यंत सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण असलेल्या रुममध्ये त्याला ठेवण्यात आले होते. या रुमचे वैशिष्टय म्हणजे यात बाहेरची अशुद्ध हवा आत येत नाही. अशा वातावरणात ही सर्व प्रक्रिया पार पडली. त्यानंतर डॉ. कलंत्री आणि हिमॅटोलॉजी विभागातील कुशल परिचारिकांच्या मदतीने बहिणीच्या शरीरातील स्टेमसेल्स तरुणाच्या शरीरात यशस्विपणे प्रत्यारोपित करण्यात आल्या.

- Advertisement -

या प्रक्रियेनंतर १० ते १२ दिवसांत तरुणाच्या शरीराने मूलपेशी स्विकारल्याचे दिसून आले. त्यानंतर पुढील दोन आठवड्यांत रुग्णाच्या विविध तपासण्यांनंतर व रुग्णाची तब्येत स्थिर असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. आपल्या दातृत्वाने भावाचा जीव वाचला हा विचार बहिणीच्या मनात आल्याने तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने हे सर्व उपचार करण्यातआले. रक्षाबंधनाच्या तोंडावर या तरुणाला घरी सोडण्यात आल्याने संपूर्ण कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला. पुढील काही महिने या तरुणाच्या नियमित तपासण्या करुन त्याच्यावर लक्ष्य ठेवले जाणार आहे. आपल्या भावाला जीवनदान देऊन बहिणीने दिलेली ही अनोखी भेट बहिण-भावाच्या नात्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट करुन गेली.

यासाठी बोनमॅरो महत्त्वाचा

बोनमॅरो हे हाडांच्या पोकळीतील पेशीजाल असते. या पेशीजालात रक्तघटक निर्माण करणार्‍या पेशी असतात. बोनमॅरो शरीरात सातत्याने रक्त, रक्तघटकांची भरपाई करत असते. बोनमॅरो हा रक्तमातृक पेशींचा उत्तम साठा असतो. रक्ताचा कर्करोग वा तत्सम रक्तविकारांमध्ये बोनमॅरो ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते.

गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी पंतप्रधान सहायता निधीसोबतच साई संस्थान, वेदिक्युअर फाउण्डेशन अशा संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. बोनमॅरो ट्रान्स्प्लाण्ट विभाग हा एकमेवाद्वितीय असल्याचे यशस्वी शस्त्रक्रियांमधून सिद्ध झाले आहे. अशा शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सर्व उच्च दर्जाच्या सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. : शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको चॅरिटेबल ट्रस्ट

रोगनिदान झाल्यानंतर कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. मात्र, या आजार व अत्याधुनिक उपचारांची माहिती दिल्यानंतर त्यांना धीर वाटला. नामको हॉस्पिटलमधील उच्च तंत्रज्ञान व अद्ययावत सुविधांमुळे बोनमॅरो ट्रान्स्लाण्टची प्रक्रिया यशस्वी झाली. यापुढेही अधिकाधिक रुग्णांना या सुविधांचा लाभ देऊन बरे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. : डॉ. सिद्धेश कलंत्री, तज्ज्ञ हिमॅटोलॉजिस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -