Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना टोलमध्ये सवलत

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना टोलमध्ये सवलत

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणार्‍या भाविकांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टिकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.

आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणार्‍या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना टोलमधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज,शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

कोकणात जाणार्‍या वाहनांसाठी स्टिकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याची सूचनाही शिंदे यांनी केली. मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करून गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

- Advertisement -

पथकर नाक्यांवर गणेश भक्तांशी वाद घालू नका. पथकर सवलतीचे स्टिकर्स उपलब्ध करून देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचेही शिंदे यांनी सांगितले.

महामार्ग पोलीस तैनात
कोकणात जाणार्‍या मार्गावर स्थानिक पोलिसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये. वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त पोलीस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार आदी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -