घरताज्या घडामोडीशरद पवारांच्या लढ्यातूनच आम्ही प्रेरणा घेतली - हेमंत सोरेन

शरद पवारांच्या लढ्यातूनच आम्ही प्रेरणा घेतली – हेमंत सोरेन

Subscribe

झारखंड विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाने भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. झारखंडचे नेते शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यासोबत आघाडी करत बहुमत प्राप्त केलं. या आघाडीने झारखंड विधानसभेच्या ८१ पैकी ४७ जागा मिळवत बहुमताचा आकडा गाठला. तर गतवेळी सत्ताधारी असलेल्या भाजपला अवघ्या २५ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी झारखंडच्या विजयाबद्दल हेमंत सोरेन यांना शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. या ट्विटला उत्तर देताना सोरेन यांनी पवार यांचा महाराष्ट्रातील लढा पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली, असे म्हटले आहे.

हेमंत सोरेन यांनी पवारांचे ट्विट रिट्विट करत पवारांचे आभार मानले. तुम्ही महाराष्ट्रात दिलेला लढा पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली, असे सोरेन म्हणाले आहेत. विधानसभा निवडणूकीत शरद पवारांनी राष्ट्रवादीचा किल्ला एकहाती लढविला होता. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या १३ जागा वाढल्या, काँग्रेसलाही दोन जागांचा फायदा झाला तर भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या होत्या. शरद पवारांनी महाराष्ट्रात स्थानिक प्रश्नांना प्रचाराच्या अग्रभागी ठेवले होते. हाच कित्ता हेमंत सोरेन यांनी झारखंडमध्ये गिरवला आणि भाजपच्या राष्ट्रीय मुद्द्यांना मुठमाती दिली.

- Advertisement -

शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये सोरेन यांचे कौतुक करताना म्हटले होते की, “झारखंडमधील विजयाने भाजपचा पराभव करण्याचा नवा मार्ग मिळाला असून यामुळे भाजपची भगवी लाट देशातून कमी करता येणार आहे.” त्याआधी सोमवारी झारखंडचा निकाल आल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन झारखंडच्या जनतेचे आभार व्यक्त केले होते. भाजपने पैशांचा वापर करुनही जनतेने त्यांना नाकारले, असे पवार म्हणाले होते.

- Advertisement -

हेमंत सोरेन यांच्या ट्विट नंतर जयंत पाटील यांनी देखील ट्विट करत शरद पवारांच्या प्रेरणेतून देशभर परिवर्तन होत असल्याचे म्हटले आहे.

झारखंडच्या विजयानंतर झामुमोचे प्रमुख हेमंत सोरेन २७ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत झामुमोचे ६, काँग्रेसचे ५ आणि आरजेडीचा १ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -