राज्यात लवकरच पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती

कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्याच्या मंत्रीमंडळाने दोन टप्प्यात पोलीस भरती करायचं ठरवलं होतं. यावेळी पहिल्या टप्प्यात ५ हजार पोलिसांची भरती झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७ हजार २०० पोलिसांची भरती करण्यासंदर्भात नियमामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक होतं. ती दुरूस्ती झाल्यानंतर आज गृहविभागाने निर्णय घेतलेला आहे. उरलेली पोलीस भरती त्वरीत सुरू करावी, यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश देण्यात आले आहेत. लवकरच ही पोलीस भरती सुरू होईल, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

आज कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. आज फक्त जे महत्त्वाचे विषय होते. त्यावर फक्त चर्चा झाली आहे. उद्या देखील कॅबिनेटची बैठक होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिले आहेत. त्यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

फ्लोअर टेस्टबाबत प्रश्न पत्रकारांनी विचारला दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, फ्लोअर टेस्टबाबत आम्ही काहीही सांगू शकत नाही. आमचे वरिष्ठ नेते बैठक आणि निर्णय घेतील.

पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना सर्वाधिक संधी देणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या गृह विभागातर्फे रिक्त ७२३१ पदे भरली जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वीच राज्यातील पोलीस दलात भरती करण्याबाबत सरकारचे नियोजन होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी आता हा मोठा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : बंडखोर आमदारांना भाजपने ७ हजार कोटी रूपये दिले, चंद्रकांत खैरे यांचा आरोप