माझ्याकडे बहुमतापेक्षा अधिक आमदार – एकनाथ शिंदे

सत्ता स्थापनेसाठी किंवा पाठिंबा काढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, परंतु सर्व आमदारांची बैठक होईल. त्यानंतरच पुढची रणनीती ठरणार आहे. बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. कारण अल्पमतात जे लोक आहेत, त्यांना निलंबन करण्याचे अधिकार नसतात.

Eknath Shinde

बहुमतापेक्षा अधिक आमदारांची संख्या आपल्याकडे असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. (I have majority, says sena rebal mla eknath shinde)

एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते म्हणाले की, बहुमताचा जो आकडा लागतो तो पूर्ण झाला आहे. त्यापेक्षा जास्त आमदारांची संख्या झाली आहे. त्याचबरोबर अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. सगळ्या तांत्रिक बाबीदेखील पूर्ण झाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी किंवा पाठिंबा काढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, परंतु सर्व आमदारांची बैठक होईल. त्यानंतरच पुढची रणनीती ठरणार आहे. बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. कारण अल्पमतात जे लोक आहेत, त्यांना निलंबन करण्याचे अधिकार नसतात.

हेही वाचा – मुंबईतील मतदारांमध्ये ७ लाखांनी वाढ; मतदार यादी प्रसिद्धी

बहुमत असल्यामुळे तसेच मीटिंगला आले नाही म्हणून जर निलंबन होत असेल तर हे देशातील पहिले उदाहरण ठरेल. जो अधिकार नाही तो अधिकार राबवता येणार नाही. या देशात राज्यघटना आहे, नियम आहे. त्याप्रमाणे चालावे लागेल. कोणाला वाटते तसे वागता येणार नाही. येथे ३७ आमदारांचा जो गट आहे तोच महत्त्वाचा गट आहे. सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांना जे पत्र पाठवले आहे ते चुकीचे आहे. सुनील प्रभूंना तसे अधिकार नाहीत. कारण ते आता अल्पमतात आहेत. खरी शिवसेना आमची असा कोणताही दावा आम्ही केला नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बहुमत आमच्याकडे आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे हीच आपली महाशक्ती असल्याचा खुलासा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना संबोधित करतानाचा एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये शिंदेंनी एक महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला होता. ही महाशक्ती नेमकी कोणती, असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला असता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ही महाशक्ती असून त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्षांकडून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता
शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी अखेर मान्यता दिली. त्यामुळे शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पहिला धक्का बसला आहे. शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी करीत शिवसेना विधिमंडळ गटनेतापदावर शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि सभागृहातील मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला विधिमंडळाने मान्यता दिली असून तसे पत्र शिवसेनेला देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.