हिंमत असेल तर महिनाभरात निवडणूक लावा; उद्धव ठाकरेंचे अमित शहांना आव्हान

मुंबई – सध्या मुंबईवर लचके तोडणारी गिधाडांची अवलाद घिरट्या घालत आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे. मुंबई स्क्वेअर फुटावर विकायची आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की भाजपला मुंबईची आठवण येते. अमित शहा त्यापैकीच एक आहेत. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबईत येत शिवसेनेला जमीन दाखवा, असे ते म्हणाले, पण तुमचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाहीत. हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणूक घेऊन दाखवा. तुम्हाला आम्ही आस्मान दाखवू, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांना दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, शेवटची निवडणूक समजून ही निवडणूक लढा, पण आपल्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून लढा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. बुधवारी गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात आयोजित शिवसेना गटप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर दसरा मेळाव्याआधीच घणाघाती टीका केली. सोबतच काहीही झाले तरी दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून होत असलेल्या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यावेळी लढाई कशी होणार हे लक्षात घ्या. मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान मैदानात उतरणार आहेत. बंडखोरांची टोळी सोबतीला आहे. ठाकरे कुटुंब संपवायला आपला मुन्नाभाई जोडीला घेतला आहे. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहतो आणि आम्हीही त्याच लढाईची वाट पाहतोय. महापालिका बरखास्त झाली आहे. नगरसेवक नाहीत. गेलेले खासदार, आमदार गेल्या निवडणुकीतच पडले. त्यामुळे आता कामाला लागा. खळाळता झरा पुन्हा कामाला लागला पाहिजे. शिवसेनेची प्रत्येक शाखा उघडी राहिलीच पाहिजे. त्यात गटप्रमुख असलाच पाहिजे. आपण अनेक कामे केली आहेत. ही कामे आता लोकांपर्यंत पोहचवायचे काम केले पाहिजे, असे निर्देशही उद्धव ठाकरेंनी दिले.

शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेलो आम्ही शिवसैनिक आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशहा, निजामशहा स्वराज्यावर चालून आले होते. त्याच कुळातले आताचे शहा म्हणजे अमित शहा मुंबईवर चालून आले आहेत. देशाचे गृहमंत्री असूनही मुंबईत येऊन ते काय बोलून गेले? तर शिवसेनेला जमीन दाखवा, पण त्यांना माहीत नाही की इकडे जमिनीतून फक्त गवताची पातीच उगवत नाहीत, तर तलवारीची पातीही उगवतात. तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, पण आम्ही तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.

बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रात फिरतेय

उद्धव ठाकरे म्हणाले की, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई हे नाव मी दिलेले नाही. हे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे. दुर्दैवाने याच कमळाबाईसोबत आम्हाला युती करावी लागली. वंशवादावरून टीका होते, कुटुंबावर टीका होते. मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा. कारण संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली तेव्हा माझे आजोबा त्यात सामील होते. रण पेटलेले असताना माझे वडील आणि काका या लढाईत होते. जनसंघाने ही समिती फोडली. ही त्यांची अवलाद. सध्या मुलं पळवणारी टोळी असल्याची अफवा आहे, पण बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रभर फिरतेय. ठाणे- पालघरमध्ये मुली विकल्या जात आहेत आणि आपले मुख्यमंत्री फिरताहेत. गल्लीत गोंधळ आहे आणि हे दिल्लीत मुजरा करीत फिरतात.