घर उत्तर महाराष्ट्र बेकायदेशीर फी, डोनेशन प्रकरण, २० महाविद्यालयांची चौकशी

बेकायदेशीर फी, डोनेशन प्रकरण, २० महाविद्यालयांची चौकशी

Subscribe

नाशिक : शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गठीत केलेल्या चौकशी समिती जिल्ह्यातील तब्बल २० महाविद्यालयांमध्ये येत अतिरिक्त बेकायदेशीर फी व डोनेशनबाबत चौकशी करणार आहे. सहाय्यक संचालक एल. डी. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत तक्रारींबाबत चौकशीचे कामकाज कनिष्ठ व उच्च माध्यमिक विद्यालयात उपस्थित राहून केले जाणार आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीस सर्व अभिलेखे चौकशीकामे उपलब्ध करुन द्यावेत. तक्रारीसंदर्भात खुलासा पुराव्यासह चौकशी समितीस सादर करावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना केले आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी व्हावी, अनुदानित आणि विना अनुदानित तुकडीची फी शिक्षण उपसंचालकांनी ठरवून दिल्याप्रमाणे असावी, महाविद्याल्याचा दर्शनी भागावर फलक लावून विद्यार्थी पालकांना कळविण्यात यावी, विनाअनुदानित महाविद्यालयांना शासनाने २० टक्के व ४० ट्क्के अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे २०२२-२३ व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या फीमध्ये कपात करुन फी धारणेत बदल करावा. मात्र, महाविद्यालय हे शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी डोनेशन आकाराले जात आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी डोनेशन आकारले जाणे हे बेकायदेशीर आहे, अशा महाविद्यालयांची शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गठीत केलेल्या चौकशी समितीतर्फे चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

महाविद्यालय, कोणतीही तुकडी स्थापन करीत असताना शासनास भौतिक सुविधा उपलब्ध करुन देवू, असे बंधपत्र संबंधित महाविद्यालय शासनास देते. असे असताना देखील महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून विकासनिधी, इमारतनिधी, जिमखाना, अतिरीक्त सत्र, बोनाफाईड, संगणक, दाखला आणि परीक्षांच्या नावाखाली अतिरिक्त फी वसूल करत आहेत. सदर फी कॅपीटेशन अ‍ॅक्ट नुसार पूर्णपणे बेकायदेशीर असून, तातडीने ही मनमानी बंद करुन विद्यार्थांची आर्थिक लूट थांबवावी.

शासनाच्या ६ मार्च १९८६ च्या शासन निर्णयाप्रमाणे पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलीच्या मोफत शिक्षणाचा कायदा असताना देखील महाविद्यालयांनी मुलींकडून बेकायदेशिररित्या फी घेतल्याचे निर्दशनास आले आहे. तातडीने विद्यार्थीनीची फी परत करुन मुलींच्या मोफत शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी. संबंधित महाविद्यालयावर तातडीने कार्यवाही करावी.
विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालणारे कोर्सेस आणि वर्गांची माहिती ही विद्यार्थी संख्यानिहाय मिळावी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तुकडीच्या फी संदर्भातील लेखा परिक्षण अहवाल पालक शिक्षक संघ बैठकीत फी मान्यतेचा अहवाल, विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा तपशिल तसेच विनाअनुदानित वर्गांसाठी आकारण्यात येणार्‍या विद्यापीठ व शासन नियमानुसार फी चा तपशील सादर करावा, असे शिक्षण उपसंचालक चव्हाण यांनी प्राचार्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या महाविद्यालयांची होणार चौकशी

- Advertisement -

विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या फीसंदर्भात छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेल्या महाविद्यालयांची नावे

 • केटीएचएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर, नाशिक
 • भोसला मिलिटरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक
 • कर्मवीर गणपतदादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निफाड
 • वैनतेय कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, नाशिक
 • सुखदेव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदिरानगर, नाशिक
 • ग्रामोद्य कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लेखानगर, नाशिक
 • डी. वाय. बिटको बॉईज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सीबीएस, नाशिक
 • यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सीबीएस, नाशिक
 • जे. डी. सी. बिटको कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाशिकरोड
 • जी. डी. सावंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाथर्डी फाटा, नाशिक
 • श्रीराम सदाशिव धामणकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसूळ, नाशिक
 • कर्मवीर काकासाहेब वाघ वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सरस्वतीनगर, नाशिक
 • लोकनेते व्यंकटराव हिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पंचवटी
 • एचपीटी व आरवायके कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कॉलेज रोड, नाशिक
 • बीवायके वाणिज्य महाविद्यालय, कॉलेज रोड, नाशिक
 • जनता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सातपूर
 • केएसकेडब्ल्यू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उत्तमनगर, नवीन नाशिक
 • सीएमसीएस वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगापूररोड, नाशिक
 • छत्रपती शिवाजी महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मखमलाबाद.
 • क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शरणपूर रोड, नाशिक
- Advertisment -