घरमहाराष्ट्रकसबा - चिंचवड पोटनिवडणुकीचा उद्या निकाल, वाचा एक्झिटपोलचा कौल कुणाला

कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीचा उद्या निकाल, वाचा एक्झिटपोलचा कौल कुणाला

Subscribe

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. पण त्याआधीच एक्झिटपोलच्या निकालानुसार कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार? याबाबतची माहिती समोर आली आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. गुरुवारी या दोन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांचा भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. अनेक दिग्गज नेतेमंडळींना या निवणुकींच्या प्रचार फेरीला देखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

सायन्स फॉर लाईफ, प्राब, रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा या चार संस्थांचा एक्झिट पोल समोर आलेला आहे. या एक्झिटपोलनुसार, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी होणार असून या मतदारसंघात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. तर चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपला आपला गड राखता येणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळणार असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

या एक्झिटपोलच्या निकालामुळे मात्र भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण भाजपला या दोन्ही मतदारसंघामध्ये मनसेने देखील पाठिंबा जाहीर केला होता. तर केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रोड शो करत जोरदार प्रचार देखील केला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांना देखील कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर लावून प्रचारासाठी बोलवण्यात आले होते

दरम्यान, या एक्झिटपोलच्या निकालाआधीच कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकण्यास सुरुवात झाली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयी होणार असे पोस्टर लावण्यात आले आहेत. कसबा पेठमध्ये भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता अधिक आहे. कारण या मतदारसंघात भाजपविरोधी नाराजी ही स्पष्टपणे दिसून आली होती.

- Advertisement -

२०१९मध्ये कसबा पेठ मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक या विजयी झाल्या होत्या. परंतु मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीमध्ये मुक्ता टिळक यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाने आपली नाराजी उघडपणे दाखवत पोस्टरबाजी केली. तर दुसरीकडे हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन भाजपची डोकेदुखी वाढवली.

हेही वाचा – आमदार सुनील प्रभूंची राज्य सरकारवर टीका

तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. पण यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेले राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत मविआची झोप उडवली. यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत झाली आहे. ज्यामध्ये एक्झिटपोलनुसार, भाजपला आपला हा गड राखण्यात यश मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कसबा पेठ विधानसभा २०१९ निकाल
मुक्ता टिळक भाजप ७५ हजार ४९२ मते (विजयी)
अरविंद शिंदे – काँग्रेस – ४७ हजार २९६ मते
विशाल धनवडे – शिवसेना बंडखोर – १३ हजार ९८९ मते
अजय शिंदे – मनसे – ८,२८४

कसबा पेठ विधानसभा २०१४ निकाल
गिरीश बापट – भाजप – ७३ हजार ५९४ मते (विजयी)
रोहित टिळक – काँग्रेस – ३१ हजार ३२२ मते
रवींद्र धंगेकर – मनसे – २५ हजार ९९८ मते
दिपक मानकर – राष्ट्रवादी – १५ हजार ८६५ मते

कसबा पेठ विधानसभा २००९ निकाल
गिरीश बापट – भाजप – ५४ हजार ९८२ मते विजयी
रवींद्र धंगेकर – मनसे – ४६ हजार ८२० मते
रोहित टिळक – काँग्रेस – ४६ हजार ७२८ मते
सतीश शितोळे – बसपा – १,३९६ मते
अनिस अहमद – सपा – १,११० मते
मिलिंद एकबोटे – एबीएचएम – १,०२७ मते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -