मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा; नाना पटोलेंची मागणी

Nana patole
महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय क्रांतीकारी - नाना पटोले

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यनंतर राजकारण तापलं असून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रीतील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकार बरखास्त करा, अशी संतप्त मागणी नाना पटोले यांनी केली. नाना पटोले यांनी लखीमपूर घटनेच्या पार्शवभूमीवर मुंबईत पत्रकार परिषद घेत घटनेचा निषेध केला.

केंद्रातील नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करावं. शेतकरी हा देशाचा प्रमुख आहे. या शेतकऱ्याची विटंबना करण्याचा अधिकार भाजपला दिलेला नाही. जर त्यांना संपवण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील मोदी सरकार बरखास्त करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसंच, लखीमपूर खेरी हिंसाचाराचा महाराष्ट्र काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला.

प्रियंका गांधींना सोडा नाही तर…

भाजप आणि उत्तर प्रदेशमधील सरकारने ठरवून केलेलं आहे. प्रियंका गांधी या तात्काळ निघाल्या परंतु त्यांना अडवण्यात आलं. त्या ठिकाणी तालिबानी सरकार आहे. तालिबानी व्यवस्था आहे. प्रियांका गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन देण्यासाठी जात असताना त्यांना अटक करुन ठेवलं आहे. या पद्धतीच्या तालिबानी शेतकरी विरोधी भाजपचं धिक्कार आणि निषेध करतो, असं नाना पटोले म्हणाले.

तसंच, महाराष्ट्रमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तातडीने यावर कारवाया झाल्या नाहीत तर महाराष्ट्र बंदची हाक आम्ही देणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.


हेही वाचा – शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची, पंतप्रधान मोदींची भूमिका आहे का?; राऊतांचा सवाल