Lakhimpur Kheri Violence : सरकार शेतकऱ्यांच्या खुन्यांना वाचवतंय; राऊतांचा हल्लाबोल

sanjay raut

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर हल्ला करत आहेत. आज पुन्हा एकदा त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पुरावे असूनही सरकार कोणाला वचवतंय आणि कशासाठी वाचवतंय? असा सवाल करत सरकार शेतकऱ्यांच्या खुन्यांना वाचवतंय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

या प्रकरणातील प्रमुख गुन्हेगार आहेत. ज्यांच्या संदर्भात सगळे पुरावे व्हिडिओ, ऑडिओ जे जे हवं आहे पुराव्यासाठी ते समोर येऊनसुद्धा सरकार कोणाला वाचवतंय आणि कशासाठी? शेतकऱ्यांच्या खुन्यांना वाचवतंय सरकार. मग कशासाठी अश्रू ढाळताय शेतकऱ्यांसाठी. पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. या गंभीर घटनेची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटली, त्यासंदर्भात सुनावणी होईल आणि आम्हाला खात्री आहे सर्वोच्च न्यायालय जे मृत झाले ज्यांना चिरडलं गेलं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देईल, असं राऊत म्हणाले.

या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रामध्ये ११ ऑक्टोबरला महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे तो राजकीय बंद नाही. गेल्या दोन वर्षापासून ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर दमनचक्र सुरु आहे, मग गाझीपूर बॉर्डर, सिंघू बॉर्डर असेल, हरयाणातला हल्ला असेल किंवा लखीमपूर खेरीचा हल्ला असेल, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला शेतकऱ्यांना संवेदना म्हणून हा संप पुकारला आहे, असं राऊत म्हणाले.