घरमहाराष्ट्रकारखाने आणि गुंतवणुकीप्रमाणे देवही परराज्यात नेताय का? अजित पवार संतप्त

कारखाने आणि गुंतवणुकीप्रमाणे देवही परराज्यात नेताय का? अजित पवार संतप्त

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरून एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त अनेक राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आसाममध्ये देखील मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे देखील आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी जाहिरात सुद्धा केली आहे. पण या जाहिरातीमध्ये त्यांनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “भीमाशंकरच्या मुद्द्यावरून अनेक लोकप्रतिनिधींनी, सरकारने मत व्यक्त केले आहे. ज्याप्रमाणे आपल्या इथले कारखाने, गुंतवणूक परराज्यात गेली. ज्यामुळे महागाई आणि बेरोजगारी वाढली. पण आता देव सुद्धा परराज्यात न्यायला लागले आहे का? अशी शंका भक्तांच्या मनात येत आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. जेव्हा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असे सांगण्यात येत आहे, तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट बोलणे महत्वाचे आहे.”

- Advertisement -

तसेच, महाराष्ट्रातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे कोणीही असे काही बोलले तर महाराष्ट्र सहन करणार नाही, असे ठाम मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, याआधी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.

यावेळी पत्रकारांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणार नाही. मला बाकिच्यांबद्दल बोलायचंच नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. तुम्ही दुसरे काही विषय असतील ते बोला. तुम्हाला कळत नाही. अजित पवार मागेच बोललेला आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार. त्यामुळे तुम्ही पुन्हा उगळून काढलं तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर, महाराष्ट्र सहन करणार नाही : अजित पवार

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे असे बोलत असतात. एसटी कामगार हे महाराष्ट्रातीलच आहेत, त्यामुळे त्यांनी एसटी कामगारांचे पगार वेळेत करावे, अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -