घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये 'पाणी' पेटलं; जायकवाडीला पाणी द्यायला विरोध

नाशिकमध्ये ‘पाणी’ पेटलं; जायकवाडीला पाणी द्यायला विरोध

Subscribe

नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यावरून मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. इगतपुरी आणि आसपासच्या स्थानिक शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समुहातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची भूमिका घेतल्याने तालुक्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दारणा परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली दारणा धरणावर संघटीत होऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी शासन व जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. कुठल्याही परिस्थितीत दारणा धरण समुहातून पाणी सोडण्यास आमचा प्रखर विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरुवारी रात्रीपासून धरणातून पाणी सोडणार असल्याचे समजताच पंचक्रोशीतील शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.

दारणा धरणातून गुरुवारी रात्री पाणी सोडण्यात येणार असल्याचे समजताच संतप्त पदाधिकारी आणि शेतक-यांनी धरणावर धाव घेत ठिय्या आंदोलन केले. उद्या शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता असंख्य शेतकरी व पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून धरणस्थळी धरणे आंदोलन, सामूहिक जलसमाधी आंदोलन, गनिमी काव्याने आंदोलन करू.

काशीनाथ मेंगाळ, माजी आमदार

धरणावर २ तास ठिय्या आंदोलन

गुरुवारी दुपारी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील पदाधिकारी अंबादास धोंगडे, भाऊसाहेब गायकर, तुकाराम गायकर आदींनी धरणस्थळी धाव घेऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तब्बल दोन तास हे ठिय्या आंदोलन सुरू होते. प्रशासनाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय हा जिल्ह्यासाठी आणि इगतपुरी तालुक्यासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे यापुढेही हे आंदोलन कायम ठेवण्याचा आणि आणखी तीव्र करण्याचा निर्णय माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

४ हजार क्युसेक्स पाणी सोडणार

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समुहातील दारणा, भाम, वाकी मुकने या धरणातून एकूण जवळपास दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रतिदिन ४००० क्युसेक्स पाणी सोडले जाणार असल्याचे समजते. चार दिवस दारणा धरणातून हे पाणी सोडले जाणार असले तरी त्याच वेळी भावली, भाम, वाकी या धरणांतूनही पाणी सोडण्यात येणार असल्याचे समजते.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -