मी कद्रू नाही, कोत्या मनाचा तर नाहीच नाही..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधानसभेत कधी आक्रमक, तर कधी नर्मविनोदी शैलीत तुफान भाषण

eknath shinde

हे सरकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आहे. राज्यातील टपरीवाला, रिक्षावाला, भाजीवाला अशा सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. सभागृहातील सदस्यांसोबतच सर्वसामान्यांसाठी काम करताना मुक्तहस्ताने निधी देईल. कारण मी मी कद्रू नाही, कोत्या मनाचा तर नाहीच नाही… असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणताना सर्व समाजाच्या लोकांना हे सरकार सोबत घेउन काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आमचे सरकार आकसाने आणि सूडबुद्धीने वागणार नाही, असा शब्दही शिंदे यांनी विरोधकांना दिला. सोमवारी विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना एरवी मितभाषी असलेल्या एकनाथ शिंदेंचे एक वेगळेच रूप महाराष्ट्राला पहायला मिळाले. गेल्या काही दिवसात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींमागील कारणे स्पष्ट करताना शिंदे यांनी कधी आक्रमक तर कधी नर्मविनोदी शैलीत जोरदार बॅटिंग करत सभागृहाचे मन जिंकले. कुटुंबात घडलेला दुःखद प्रसंग कथन करताना त्यांना हुंदका अनावर झाला होता.

हे बंड नाही तर उठाव
शिवसेनेचे ४० आणि अपक्ष मिळून आज माझ्या सोबत ५० आमदार आहेत. यातील एकही आमदार मी निवडणुकीत पराभूत होऊ देणार नाही. पुढील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे मिळून २०० आमदार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आम्ही केलेले हे बंड नव्हते तर हा उठाव होता. राज्यसभेला आमच्या दोन पैकी एक उमेदवार पराभूत झाला. आमदार तर म्हणालेही की जो पडायला पाहिजे तो पडलाच नाही. त्यावेळी मी तीन मते बाहेरून माझे संबंध वापरून मिळविली होती. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी तर मला पूर्णपणे बाजूलाच ठेवले होते, पण त्या निवडणुकीत आमचे दोन उमेदवार निवडून आले. त्यात कोणीही दगा दिला नाही. त्यानंतर मी निघालो. कोणताही विचार केला नव्हता. सरळ निघालो. उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून विचारलेही कुठे चालला आहात. मला माहिती नाही कुठे चाललो हे मी त्यांना म्हणालो. नंतर सगळ्या आमदारांशी संपर्क साधला. त्यांना म्हणालो चला सोबत. त्यांनी एका शब्दानेही विचारले नाही, कुठे जायचे. सगळे स्वतःच्या मर्जीने सोबत आले. एकटे नितीन देशमुख म्हणाले की, आईची तब्येत बरी नाही. परत जायचे आहे. त्यांना विशेष विमान करून मी परत पाठवले. आमचे टॉवर लोकेशन चेक करण्यात आले. गुजरात सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली, पण इतक्या वर्षांच्या अनुभवाने नाकाबंदीला कसे चुकवायचे मला चांगलेच माहिती असल्याचे शिंदे म्हणाले.

आमचा बाप काढला
त्यानंतर काही लोकांनी अतिशय घाणेरडी भाषा वापरली. आमचे बाप काढले. कोण रेडा म्हणाले, पोस्टमॉर्टेम काय, वेश्या काय, बळी द्यायचेय काय, किती तरी घाणेरडे शब्द वापरण्यात आले. माझा स्वभाव शांत आहे, पण अन्याय झाल्यावर शांत राहत नाही. माझ्या घरावर दगड मारण्याचेही आदेश देण्यात आले, पण एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की या एकनाथ शिंदे याच्या घरावर दगड मारणारा अद्याप पैदा झालेला नाही. माझे कार्यकर्ते हे मधमाशांचे मोहोळ आहेत. दगड मारलात तर चावा घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिला. आमचा बाप काढला गेला. माझे वडील जिवंत आहेत. माझी आई वारली. मी कधी कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. मुलगा श्रीकांतलाही वेळ देऊ शकलो नाही. जो काही वेळ दिला तो शिवसेना आणि शिवसैनिकांनाच दिला, असे शिंदे म्हणाले. माझ्या सोबतचा एकही आमदार हलला नाही. गरज भासली तर मी एकटा शहीद होईन, पण तुमचे भवितव्य निश्चित करूनच मी या जगाचा निरोप घेईन, असा शब्द मी दिला होता, असे शिंदे म्हणाले.

माझ्या मुख्यमंत्रीपदाला अजितदादांचा विरोध नव्हता
मला कोणत्याही पदाचा मोह नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. नितीन गडकरी एका कार्यक्रमात मला म्हणालेही, की लवकरच तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल, पण तेव्हा मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण मला माहिती होते की उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारलाच जाणार नाही, कारण स्वीकारला तर ते मला द्यावे लागेल. नंतर आघाडी सरकारच्या वेळी मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची चर्चा होती, पण सांगण्यात आले की अजित पवारांचा विरोध आहे, मात्र नंतर खुद्द अजितदादाच मला म्हणाले की आमचा विरोध असण्याचा प्रश्नच नव्हता. तो तर तुमच्याच पक्षाचा निर्णय होता, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे गहिवरले
माझी दोन मुले माझ्या डोळ्यासमोर गेली. माझ्या कुटुंबावर तो मोठा आघात होता. माझ्यासाठी सगळेच संपले होते. आता पत्नी, श्रीकांत आणि आई वडील यांच्यासाठीच जगायचे, असाच विचार मी केला होता असे सांगताना एकनाथ शिंदे यांना हुंदका अनावर झाला. उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिंदेंच्या पाठीवर हात फिरवत त्यांना शांत केले. या घटनेनंतर धर्मवीर आनंद दिघे यांनी मला सावरले. पाच वेळा माझ्या घरी आले. मला ठाणे महापालिकेचा सभागृह नेता बनविले. तुझ्या डोळ्यातील अश्रू विसरून जा. आता कोणाच्याही डोळ्यात अश्रू येणार नाही यासाठी काम कर, असे ते मला म्हणाले. तेव्हापासून मात्र मी कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर जेव्हा दिघेसाहेब गेले तेव्हा वाटले की ठाणे, पालघरमधील शिवसेना संपली. बाळासाहेबांना पण चिंता होती, पण त्यातूनही सगळ्यांना बाहेर काढले, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही आजही शिवसैनिकच
आम्ही कालही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिकच आहोत, पण आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. बाळासाहेबांनी ज्यांच्याशी सतत संघर्ष केला त्यांच्याबरोबरच कसे बसायचे? हा प्रश्न होता. मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पाच वेळा बोललो होतो, मात्र अगदीच असह्य झाले तेव्हा हा निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.माझ्या खात्यात हस्तक्षेप होत होता.

नगरविकास खाते असताना माझ्या खात्यात सातत्याने हस्तक्षेप होत होता, पण मी कधी काही बोललो नाही. आता देखील आमदार, कार्यकर्ते पत्र घेऊन रिमार्क मागतात, पण मी रिमार्क देत नाही. त्यात वेळ खूप जातो. आता थेट जिल्हाधिकार्‍यांना फोन करूनच काम करायला सांगतो. ते केले तरच २०० आमदार पुढच्या वेळेस निवडून येतील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.