आलेले उद्योग घालवले आणि सरकारचे आता नको ते उद्योग सुरू; अजित पवारांचा घणाघात

mahavikas aghadi long march against shinde fadanvis govt on 17 december ajit pawar criticize maharashtra govt

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराज, आणि महापुरुषांबद्दलची वादग्रस्त विधाने, राज्याबाहेर जाणारे उद्योग धंदे याविषयांच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आहे. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. यावेळी मविआ नेत्यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहेत. तसेच राज्यपालांना पदावरून हटवले तरी हा मोर्चा निघणारचं असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी दिली आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवरून शिंदे- फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकार म्हणते दुसरे उद्योग आणू आम्ही दुसरे उद्योग आणू… अरे जे आले ते घालवले आणि दुसरे उद्योग कोणता आणता? सरकारचे बाकीचे नको ते उद्योग चालले आहेत. अशी टीका अजित पवारांनी केली आहे. याचसंदर्भात आता महाविकास आघाडीने एकी करण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सत्ताधारी पक्षाचे नेते करत असलेला अपमान, राज्याचे राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांचे महापुरुषांबाबतची बेताल वक्तव्ये याचा निषेध करण्यासाठी, आणि राज्यपालांना पदावरून बाजूला करण्यासाठीच्या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. 8 डिसेंबर ते 17 डिसेंबरच्यादरम्यान राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणारचं आहे. अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी मांडली.

शिंदे-  फडणवीस सरकारचे बाकीचे नको ते उद्योग सुरु 

छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुषांसंदर्भातील मुद्दे आहेत, महागाईचा मुद्दा आहे. बेरोजगारी वाढतेय हे सरकारचे अपयश आहे. मोठे मोठे उद्योग जात आहेत. वेगवेगळ्या आढावा घेणाऱ्या संस्थांच्या अहवालातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली चांगलं काम झालं असं पुढे आलं होतं. मात्र शिंदे फडणवीस सरकारचं सहा महिन्यांच्या काळातील जे अपयश आहे, त्याबद्दल हे बोलत नाहीत. आम्ही दुसरे उद्योग आणू आम्ही दुसरे उद्योग आणू… अरे जे आले ते घालवले आणि दुसरे उद्योग कोणते आणता? बाकीचे नको ते उद्योग सुरु आहेत. अशी जहरी टीका अजित पवारांनी केली आहे.

कर्नाटकमध्ये जाण्याची शिंदे सरकारमध्ये धमक, ताकद नाही? 

कर्नाटकचे मुख्यमंत्री एवढी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करतात, तिथे पण भाजपचं सरकार, इथेही भाजप सरकारमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री…. इथल्याच मुख्यमंत्र्यांना कर्नाटकमध्ये जाण्यास बंदी? हे कसं सहन करतात. देशातील कुठल्याही राज्यात कोणालाही जाण्याचा अधिकार आहे. परंतु लगेचच शिंदे सरकारने पळकुटेपणा करत माघार घेतली आणि म्हटले की, ठीक आहे आम्ही सध्या जात नाही आम्ही नंतर विचार करतो, अरे का जात नाही? तुमच्यामध्ये धमक नाही,  ताकद नाही? महाराष्ट्राची परंपरा काय, महाराष्ट्राची संस्कृती काय? महाराष्ट्राने आजवर कोणता विचार मांडला, महाराष्ट्र आजवर झुकलेला नाही…हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चाललं आहे. मात्र त्या सगळ्याला बाजू सारण्याचे काम शिंदे आणि फडणवीस सरकार करत आहे. आणि लंगड समर्थन करण्याची वेळ त्यांच्यावर येत असताना उभा महाराष्ट्र पाहतोय. अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम सुरु आहे. भावनेला ठेच पोहचली आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा असल्याचे अजित पवार म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील देगलूरसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षे सरकार चालवत असताना त्यावेळचे देगलूर पालकमंत्री अशोक चव्हाण असताना तेथील गावांनी आम्हाला तेलंगणामध्ये जायचं असं सांगितलं नाही. आज ती गाव तेलंगणामध्ये जाण्याची मागणी करत आहेत. नांदेडमधील देगलूर, सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, गुजरात सीमेलगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील तसेच अन्य गावांसाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक विकासकामे जाहीर करून त्यासाठी निधीही उपलब्ध केला होता. त्या कामांना स्थगिती देण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केले असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. इतकचं नाही तर नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील अदिवासी गावं जी गुजरातच्या सीमेलगत आहेत ती देखील अशी मागणी करत आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला सांगावं की, वेगवेगळे राज्यकर्ते आजवर मंत्री म्हणून काम करत होते, परंतु कोणाच्याही काळात अशाप्रकारे सीमेवरील तालुक्यातील गावांनी ही इच्छा प्रदर्शित केली नव्हती. असही अजित पवार म्हणाले.

विविध गावांसाठीच्या तरतूदी शिंदे फडणवीस सरकारने थांबवल्या

या गावांमध्ये त्यावेळी लक्ष दिलं जात होते. पालकमंत्री असताना डीपीसीमध्ये त्यांनी तरतूद केली होती ती तरतूद थांबवली. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांनी तरतूद केली होती ती देखील थांबवली, नाशिक, नंदरबार जिल्ह्यात छगन भुजबळ यांनी तरतूद केली होती त्याला स्थगिती दिली, त्यामुळे तिथेही असंतोष आहे, असं कधी राज्यात घडत नव्हतं, असही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मविआच्या विराट मोर्चात अनेक घटक पक्ष सहभागी होणार 

विराट मोर्चात महाविकास आघाडीतील तीन पक्ष तर सहभागी आहेत, मात्र यात समाजवादी पार्टीचे अबू आझमी, कपिल पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, मिलिंदजी, रानडेजी असे अनेक घटक पक्ष यात सहभागी होणार आहेत. 8 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पुढील मोर्चाची आखणी करण्यासाठी या सर्व राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी मविआ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, सुभाष देसाई, विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, अशोक चव्हाण असे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.