मराठी भाषा भवनाला जवाहर भवनात जागा; राज्य सरकारचा निर्णय

मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी जवाहर बाल भवनात जागा देण्याबाबतचा शासन आदेश राज्याच्या महसूल आणि वन विभागाने जारी केला. 

Marathi Bhasha Bhavan main center will be inside the Maharashtra State Jawahar Bal Bhavan
मराठी भाषा भवनाला जवाहर भवनात जागा

बहुचर्चित मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. मराठी भाषा भवनासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जागेचा शोध सुरु होता. मराठी भाषा विभागाच्यावतीने त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपूर्वी धोबी तलाव येथील रंगभवनात जागेचा पर्याय पुढे आला होता. मात्र, या रंगभवनाला वारसा वास्तू दर्जा असल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या.

इतर जागेचा शोध सुरु होता

रंगभवनाच्या शेजारीच कामा आणि जीटी रुग्णालय असल्याने या परिसरात ध्वनीक्षेपक वापरण्यास मनाई करण्याबाबत जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल होती. त्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता होता. त्यामुळे इतर जागेचा शोध सुरु होता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी जवाहर बाल भवनात जागा देण्याबाबतचा शासन आदेश राज्याच्या महसूल आणि वन विभागाने सोमवारी जारी केला.