घरCORONA UPDATEकोराेनाशी लढणाऱ्यांना दिला जातोय मानसिक त्रास; गुन्हे दाखल करण्याचे आदेश

कोराेनाशी लढणाऱ्यांना दिला जातोय मानसिक त्रास; गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Subscribe

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या त्या योद्धाना ते राहत असलेल्या गृहसंकुलातील रहिवाशांकडून त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. देशात आणि राज्यातही कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, कोरोनाबाधित रूग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर, नर्स वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती सफाई कर्मचारी पोलीस व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. मात्र, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या त्या योद्धाना ते राहत असलेल्या गृहसंकुलातील रहिवाशांकडून त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. यासंबधीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे करोनाशी लढणाऱ्या व्यक्तींना त्रास देणाऱ्या गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकारी अथवा सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहे.

ठाण्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा १८० वर पोहोचला आहे, तर जिल्ह्यात रूग्णांची संख्या ५४५ झाली आहे. शहरातील विविध रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर नर्स व वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्ती  त्यांना वाचविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी सफाई कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. मात्र, या व्यक्तींना त्यांच्या सोसायटीतील रहिवाशांकडून त्रास दिल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग सोसायटीपर्यंत येईल, अशी भिती त्यांना वाटत आहे. तुम्ही बाहेरच राहा, येथे येऊ नका, असेही त्यांना सांगितले जात आहे.  तसेच रहिवाशी संकुलातील सुविधांचा वापर करण्यास निर्बंध घालत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एकिकडे जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत असतानाच दुसरीकडे अशा प्रकारे वागणूक मिळत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे शहरात अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे कोराेनाशी लढा देणाऱ्यांना त्रास देणाऱ्यांविरोधात पोलीस आणि महापालिकेकडून कडक भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

गुन्हे दाखल करा – पोलीस आयुक्तांचे आदेश 

ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये राहणारे डॉक्टर नर्स वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती पोलीस स्वच्छता विभागातील सफाई कर्मचारी यांना गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी अथवा सदस्यांकडून कोणताही त्रास झाल्यास त्या सोसायटीमधील संबधितांवर साथ रोग प्रतिबंध कायदा सन १८९७ आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ तसेच भारतीय दंड संहिता सन १८६० च्या अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ज्या गृहनिर्माण संस्थाविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा सुमारे १४०० संस्थांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -