घर उत्तर महाराष्ट्र तलाठी पेपरफूटी प्रकरणी आणखी धागेदोरे समोर; 'यामुळे' वापरले वॉकी-टॉकी

तलाठी पेपरफूटी प्रकरणी आणखी धागेदोरे समोर; ‘यामुळे’ वापरले वॉकी-टॉकी

Subscribe

नाशिक : परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर असल्याने परीक्षार्थींना मदत करणार्‍या संशयिताने चक्क वॉकीटॉकी यंत्रणा वापरली होती. यानिमित्ताने कॉपीबहाद्दर पोलिसांच्याही पुढे गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या संशयिताला न्यायालयाने शुक्रवारी (दि.१८) चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नाशिकमध्ये गुरूवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून पोलिसांनी गणेश श्यामसिंग गुसिंगे (वय २८, रा. मु. सूजारपूरवाडी, पो. परसोडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) या तरुणाला अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारपासून (दि. १७) सुरू झाली. शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. यावेळी परीक्षा केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकीटॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि श्रवणयंत्र असे साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये तलाठी पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचे फोटोही आढळून आले. संशयित आरोपीसोबत आणखी दोन ते तीन साथीदार असल्याचा पोलिसांना संशय असून, पोलीस इतर साथीदारांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

या प्रकरणामुळे अनेक वर्षांनंतर महसूल विभागाच्या तलाठी पदासाठी सुरू झालेली भरतीप्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवारांनी आधीच अशा स्पर्धा परीक्षांकरिता आकारल्या जाणार्‍या शुल्काचा मुद्दा अधिवेशनात मांडला होता. त्यात या भरतीप्रक्रियेवर कॉपी प्रकरणामुळे काही परिणाम झाला तर लाखो परीक्षार्थींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करत दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच, यासाठी कायदा बनविण्यात यावा जेणेकरून भविष्यात अशा परीक्षांमध्ये असे गैरप्रकार करण्याची हिंमत कुणी करणार नाही, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या काही तरुणांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास स. पो. निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.

अधिक धागेदोरे लागले असते हाती

नाशिकमधील घटनेची माहिती मिळताच जर राज्य सरकारने वेळीच ठोस पाऊल उचलले असते तर यामागील मोठे रॅकेट हाती लागू शकले असते.तसेच हा संशयित ज्यांना कॉपी पुरवत होता ते देखील सापडण्यास मदत झाली असती.

कॉपी प्रकरणात पोलीस झाले फिर्यादी

महसूल विभागातील भरती परीक्षेसाठी नियोजन हे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली होत असते. परीक्षेदरम्यान घडलेल्या गैरप्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता यात जिल्हाधिकार्‍यांमार्फत फिर्यादी असणे अपेक्षित होते. त्यामुळे या प्रकरणात फिर्याद देण्यासाठी पोलीस निवासी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्कात होते. परंतु, नेहमीप्रमाणे जबाबदारीपासून हात झटकत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांनाच तक्रारदार व्हावे लागले.

- Advertisment -