घरमहाराष्ट्रमुंबई, ठाणे, नवी मुंबईत दहीहंडीच्या दिवशी सन्नाटा

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत दहीहंडीच्या दिवशी सन्नाटा

Subscribe

ढाकुमाकूम गायब, कोरोना संकटामुळे दहीहंडी उत्सवावरही विरजण

कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. कोरोनाच्या कचाट्यातून सण, उत्सव, समारंभसुद्धा सुटलेले नाहीत. कोरोना संकटामुळे दरवर्षी जोरदार आणि उत्साहात साजरा होणार्‍या दहीहंडी उत्सवावरही विरजण पडले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सार्वजनिक आणि घरगुती अशा जवळपास १००० पेक्षा जास्त दहीहंडी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुठेही डाकुमाकूम, बोल बजरंग बली की जय हे स्वर कानी पडले नाहीत. एक पूजा म्हणून सर्वच दहीहंडी उत्सव मंडळांनी हंडी लावली आणि कोणत्याही थराशिवाय कमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ती फोडली. उलट दहीहंडी उत्सव मंडळांनी रक्तदान, धान्य वाटप, कोरोना जनजागृती अशा सामाजिक उपक्रमांवर भर दिल्याचे दिसून आले.

- Advertisement -

मुंबईतील दादर, वरळी, परळ, गिरगाव, ताडदेव, ठाण्यातील पाचपाखाडी, वाघळे इस्टेट, तीन हात नाका, बाळकुंभ,वर्तकनगर, नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, घणसोली, ऐरोली, दिघा परिसरात गोपाळकाल्याचा दरवर्षी जल्लोष असतो. गोविंदा पथक वाजत गाजत, दहीहंडी फोडण्यासाठी शहरभर फिरत असतात. मात्र, यावर्षी जवळपास सर्वच दहीहंड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दरवर्षी काल्याच्या दिवशी गजबजून जाणारे मुंबई, ठाणे, नवी मुंबईचे रस्ते सुनसान होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात एकही गोविंदा पथक निघाले नाही.

दहीकालाच्या दिवशी दहीहंडी उत्सव मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. जोगेश्वरी येथील प्रसिद्ध जय जवान मंडळाने गरजूंना धान्य वाटप केले. काही मंडळांनी मेडिकल किट वाटल्या. तर काही मंडळांनी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. काही मंडळांनी रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक भान जपले. दहीहंडीच्या उत्सवाचे औचित्य साधून बहुतेक सर्वच मंडळे सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -