आदर्श घोटाळ्यामुळेच काँग्रेसच्या एका नेत्याची गच्छंती झालीय?, नरेश म्हस्केंचा पटोलेंना सवाल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. कारण ते भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. त्यांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदर्श घोटळ्यामुळेच काँग्रेसच्या एका नेत्याची मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झाल्याचं विसरलात काय?, असा सवाल उपस्थित करत नाना पटोलेंवर टीका केली आहे.

नाना पटोले ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होते. त्या पक्षाचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आणि दाऊदशी संबंध असलेल्या आरोपाखाली गजाआड आहेत. आपल्या मित्र पक्षाचा भ्रष्टाचार नाना पटोले विसरले आहेत का?, आपणास माहितीच असेल की, आदर्श घोटाळ्यामुळे कॉंग्रेसच्या एका प्रस्थापित नेत्याची मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झाली होती, हे पटोले सोयीने विसरले का?, असं नरेश म्हस्के म्हणाले.

भ्रष्टाचारी कॉंग्रेसला देशातील जनतेने सत्तेतून हद्दपार केले. पटोलेंसारखे कोलांट्याउड्या मारत एका पक्षातुन दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांमुळेच कॉंग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे, त्याचा विचार करावा. भ्रष्टाचारी कॉंग्रेसला देशातील जनतेने सत्तेतून हद्दपार केले. त्यामुळे उंटावरून शेळ्या हाकण्याचे प्रकार नाना पटोलेंनी बंद करावेत, असंही नरेश म्हस्के म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आणि पारदर्शी कारभार सुरू आहे. त्यामुळे नानांसारख्या अनेक नेत्यांना पोटदुखी होत आहे. आपण आजही अस्तित्वात आहोत, हे पक्षश्रेष्ठींना दाखविण्यासाठी आहे. परंतु असले निरर्थक उद्योग नाना पटोलेंना करावे लागतात हे त्यांचे दुर्दैव आहे, असं म्हस्के म्हणाले.


हेही वाचा : …कारण ‘ते’ भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झाले, नाना पटोलेंचा हल्लाबोल