घरमहाराष्ट्रनाशिकशहरात नवीन १४ ऑक्सिजन प्लांट

शहरात नवीन १४ ऑक्सिजन प्लांट

Subscribe

अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची माहिती

दुसर्‍या लाटेची तिव्रता लक्षात घेता तिसरी लाट येऊच नये म्हणून महापालिका प्रयत्नशिल आहे. मात्र तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून १४ ऑक्सिजन प्रकल्प, ३५० नवीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि १५०० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

महापालिकेच्या फेसबुक लाईव्हमध्ये ते बोलत होते. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आणि सॅनिटायजरचा नियमीत वापर या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यास तिसर्‍या लाटेला आपण रोखू शकतो, असा विश्वास व्यक्त करीत आष्टीकर यांनी सांगितले की, सध्या तीन हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. यापुढे साडेपाच हजारांपर्यंत ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २० मेट्रिक टन क्षमता असलेले १४ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. महापालिका व खासगी हॉस्पिटल्समिळून हे काम सुरु आहे. तसेच ऑक्सिजनचा ३२ किलालिटरचा साठा वाढवून तो ३६ किलोलिटर करण्यात येत आहे. यात ३० किलोलिटरच्या दोन टाक्या आणि सहा किलोलिटरच्या दोन टाक्या असतील. खासगी रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलचा साठा ५० किलो लिटरपर्यंत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वतीने जम्बो सिलेंडर आणि ड्यूरा सिलेंडर खरेदी करण्यात येईल. १८५० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर महापालिकेने आजवर खरेदी केले आहेत. त्यात वाढ करुन नवीन ३५० घेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

- Advertisement -

म्युकरमायकोसिससाठी ऑपरेशन थीएटर

म्युकरमायकोसिससाठी ऑपरेशन थीएटरची व्यवस्था करण्यात येत आहे. रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. तिसर्‍या लाटेत आवश्यक असेल अशी औषधे, जेवण, मनुष्यबळ आदीं व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या १ हजार ७० इतके मनुष्यबळ असून त्यात १५०० पेक्षा अधिकने वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. रुग्णवाहिका ४० असून त्या ५० पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे बायोमेडिकल वेस्ट उचलण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एसओपी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय स्मशानभूमीचा शोध घेणे, नंबर लावणे यात कालापव्यय होऊ नये म्हणून महापालिकेने स्वतंत्र अ‍ॅप्लिकेशन विकसित केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आता ९४ लसीकरण केंद्र

लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यापूर्वी केवळ ५५ केंद्रांमध्ये लसीकरण केले जात होते. आता महापालिका आणि खासगी दवाखाने मिळून ९४ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. यात महापालिकेचे ३२ तर खासगी ६२ केंद्र आहेत. राज्य शासनाकडून जसजसे लसींचे डोस अधिकाधिक प्रमाणात प्राप्त होतील, त्याप्रमाणे मोहिमेची गतीही वाढवण्यात येणार असल्याचे प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -