घरमहाराष्ट्रनाशिककत्तलखान्याच्या पैशांतून अनिल कदमांनी वाटले किट

कत्तलखान्याच्या पैशांतून अनिल कदमांनी वाटले किट

Subscribe

माजी जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांचा घणाघाती आरोप

ओझर नगरपरिषदेच्या निर्मितीवरुन माजी जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांनी प्रथमच माजी आमदार अनिल कदम यांच्यावर शरसंधान साधले आहे.कत्तलखाना चालवणार्‍या व्यक्तीकडून 50 हजार रुपये घेवून नगरपरिषदेच्या 100 कर्मचार्‍यांना किराणा किट वाटल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. आजपर्यंत एकदाही याविषयी बोललो नव्हतो; परंतु, आमच्यावर आरोप होत असल्याने येत्या निवडणुकीत पुराव्यानिशी जनतेसमोर जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे राजकारण आता चांगलेच तापल्याचे दिसून येते.

यतिन कदम यांनी बुधवारी (दि.15) ऑनलाईन पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप ओझर ही नगरपरिषद झाली असे एकदाही जाहीर केलेले नाही. त्यामुळे माजी आमदार अनिल कदम यांनाच घोषणा करण्याची घाई झालेली होती. नगरपरिषद होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची अद्याप पुर्तता झालेली नाही. त्यामुळे केवळ आमच्या नागरिक आघाडीचा सरपंच येथे बसू नये म्हणून त्यांनी ही घाई केली. त्याचे दुष्परिणाम आता जनतेला भोगावे लागत आहेत. ओझरकरांना कुठलेही दाखले मिळत नाहीत. कर्मचार्‍यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यासाठी माजी आमदारांनी काय प्रयत्न केले, ते दाखवावे. आम्ही दोन वेळा जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले. त्यांनी यावर निर्णय न घेतल्यास येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचेही यतिन कदम यांनी सांगितले. यांनी कत्तलखाना चालक खलिल कुरेशी यांच्याकडून 50 हजार रुपये घेवून कर्मचार्‍यांना कीट वाटल्याचा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

कोण हा रोहन देशमुख?

ओझर नगरपरिषद झाली पाहिजे असे सर्वांना वाटते. पण, सर्व कागदपत्रांची पूर्तता न करताच प्रस्ताव पाठवण्याची घाई त्यांनी केली. आता तेच रोहन देशमुख याच्या नावाने रडत आहेत. हा रोहन देशमुख हा आहे तरी कोण? आमदार, खासदार आहे की मुख्यमंत्री त्याने नगरपरिषदेला स्टे मिळवून आणला म्हणून सांगता. जानेवारी 21 मध्ये स्टे मिळवला होता. आता त्याला 9 महिने झाले. राज्यात तुमचे सरकार असताना इतके दिवस काय झोपले होते का? तुम्हीच घोषणा करता अन् आता रडण्याचा कांगावाही तुम्हीच करता, असा आरोप यतिन यांनी केला.

मुस्लिमांच्या बदनामीचा डाव

 नगरपरिषदेच्या संदर्भात आरोप करताना यतिन कदम यांची जीभ घसरली आणि त्यांनी माझा एकेरी उल्लेख केला. मला तरी असे वाटते की त्यांचेे मानसिक संतुलन बिघडले असून, मुस्लिमांच्या बदनामी केली म्हणजे आपल्याला हिंदुंची मते मिळतील, असा त्यांचा डाव असल्याचा पलटवार माजी आमदार अनिल कदम यांनी केला आहे.

- Advertisement -

यतिन कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना असे वाटते की मुस्लिम समाजाला नाव ठेवले तर आपल्याला हिंदुंची मते मिळतील. त्यांच्या पक्षाचा हा राजकीय अजेंडा राहिला असेल, त्याविषयी मला काही देणेघेणे नाही. परंतु, मी कट्टर शिवसैनिक आहे. मला काय गमावयचे ते मी गमवून बसलो आहे. त्यामुळे माझे काम मी करत राहणार. केवळ लोकशाही आहे म्हणून कुणीही उठावे आणि आरोप करत सुटावे, हे योग्य नाही. आपल्या बरोबरीची व्यक्ती असेल तर एकेरी उल्लेख केला असता तर ठिक होते. पण, त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळेच त्यांनी हा आरोप केला असेल, असेही कदम म्हणाले. कत्तलखाना चालकाकडून 50 हजार रुपये घ्यायला मी काय वेडा आहे का? माझ्यावर विश्वास बसत नसेल तर खलिल कुरेशी याच्याकडूनच माहिती घ्या. केवळ आरोप झाला म्हणून विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य माहिती घेवून खात्री करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. आरोप करुन सत्तासुंदरी मिळवण्याचा हा घाट आहे. याव्यतिरीक्त या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य मला दिसून येत नाही. यतिन कदम यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन येत्या दोन दिवसांत ऑनलाईन पध्दतीनेच करणार आहे. माझा घसा बसलेला असल्यामुळे आवाज व्यवस्थित निघत नाही. येत्या दोन दिवसांत सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असेही अनिल कदम म्हणाले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -