घरमहाराष्ट्रनाशिककोविडविरोधी लढ्यासाठी केंद्राकडून निधी

कोविडविरोधी लढ्यासाठी केंद्राकडून निधी

Subscribe

जिल्ह्यासाठी मिळाले ४५ कोटी; आरोग्य सुविधा बळकट करणार

नाशिक : कोविडचा लढा अजून सुरूच आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी सक्षमपणे लढा देण्यासाठी केंद्राने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी इसीआरपी अंतर्गत निधी मंजूर केला आहे. नाशिक जिल्हयासाठी केंद्र सरकारकडून ४५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा बळकट करण्यासह सरकारी हॉस्पिटल्समधील बालरोग विभाग सक्षम करण्यावर भर देण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणांनी केले आहे.

देशासह राज्यात कोव्हिड-१९ व ओमायक्रॅान विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. करोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट असणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्यासाठी इसीआरपी १ अंतर्गत ११८५ कोटी रुपयांचे अनुदान दिले. सध्या इसीआरपी टप्पा २ अंतर्गत राज्यासाठी १२९४.६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निधीपैकी नाशिकच्या वाट्याला ४५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

- Advertisement -

या निधीतून जिल्ह्यात ११ ठिकाणी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात ३२ तर नाशिकचे सिव्हिल हॉस्पिटल आणि मालेगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये ४२ बेडचा अद्ययावत बालरोग दक्षता विभाग सज्ज करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत सहा बेडचे, तर पाच कोव्हिड केअर सेंटरमध्ये २० बेडचे प्री-फॅब्रिकेटेड युनिट्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय करोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ३२ एमबीबीएस डॉक्टर्स आणि १२२ आरोग्य कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय गरजू रुग्णांना टेलिफोनिक सेवेद्वारे मार्गदर्शन करण्यासाठीही या निधीचा उपयोग होऊ शकणार असल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -