घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिव्हिल : ऑपरेशनच्या साधनाविना रुग्णाची दोन महिने प्रतीक्षा

सिव्हिल : ऑपरेशनच्या साधनाविना रुग्णाची दोन महिने प्रतीक्षा

Subscribe

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याचे सांगत धुळ्याच्या रुग्णास सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी तब्बल दोन महिने रुग्णालयातच वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे बीडमधील एका रुग्णावर मात्र तात्काळ सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारात दुजाभाव केली जात असल्याची भावना रुग्णांमध्ये रुजत आहे. धुळ्याच्या एका रुग्णाने आपबिती ‘आपलं महानगर’ला सांगितली.

धुळ्यातील २४ वर्षीय रुग्ण दीपक राजेश मिस्त्री २४ जुलै २०२२ रोजी सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला. त्यांच्यासमवेत आई-वडीलसुद्धा आले. सिव्हिलमध्ये चांगल्या सुविधा व वेळेत उपचार केले जात असल्याचे त्यांना एका नातेवाईकाने सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून हे कुटुंब नाशिकला आले. प्रत्यक्षात त्यांच्या पदरी निराशाच पडली. २४ जुलैपासून रुग्णासह त्याचे आई-वडील डॉक्टरांकडे सांधेरोपण शस्त्रक्रियेबाबत विचारणा करायचे. प्रत्येकवेळी त्यांना वैद्यकीय साधने उपलब्ध नसल्याचे डॉक्टर सांगत होते.

- Advertisement -

वैद्यकीय साधने येताच शस्त्रक्रिया केली जाईल, असेही डॉक्टर त्यांना सांगायचे. दरम्यान, रुग्णालयात एका वरिष्ठ अधिकार्‍याचा परिचित एक रुग्ण बीडहून जुलै महिन्याच्या पहिल्या आडवड्यात सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी संबंधित अधिकार्‍याने डॉक्टरांना सूचना दिल्या. शिवाय, बीडच्या रुग्णाची भेट देत धीर दिला. त्यावेळी धुळ्याचा रुग्णही बीडच्या रुग्णाजवळ होता. बीडच्या रुग्णाबरोबर तुमचीही शस्त्रक्रिया केली जाईल, अस सांगितल्याचे रुग्ण दीपक मिस्तरी यांनी सांगितले. प्रत्यक्षात बीडच्या रुग्णावर सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली पण धुळ्याच्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. बीडचा रुग्ण शस्त्रेक्रियेनंतर दोन-तीन दिवसांनंतर लगेच डिस्चार्ज घेऊन गेला. त्यानंतर डॉक्तरांना शस्त्रेक्रियेबाबत विचारले असता डॉक्टर साधने उपलब्ध नसल्याचे सांगत होते.

शेवटी डॉक्टरांनी२४ ऑगस्टला डाव्या पायाची आणि सोमवारी (दि.१२) उजव्या पायाची सांधेरोपण शस्त्रक्रिया केली, असे रुग्ण दीपक मिस्तरीने सांगितले. कोणत्याही खासगी रुग्णालयात शस्त्रक्रीयेची तारीख निश्चित केली जाते आणि त्यानुसार शस्त्रक्रीयेच्या आदल्या दिवशी रुग्णाला दाखल केले जाते. धुळ्यातील दीपक मिस्तरी यांना मात्र सिव्हिलमध्ये तब्बल तीन महिने आधी दाखल करण्यात आले. तीन महिन्यांच्या काळ सिव्हिलसारख्या रुग्णालयात काढणे किती जिकरीचे असते हे येथील रुग्ण सांगू शकतात.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात उपचार व डॉक्टर चांगले असले तरी वैद्यकीय साधने वेळेत मिळत नाही. रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी वेळेत वैद्यकीय साधने उपलब्ध झाल्यास नरकयातनांमधून सुटका होईल. बीडच्या रुग्णावर आधी शस्त्रक्रिया झाली आणि माझ्यावर उशीरा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून दुजाभाव आणि अन्याय केला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. : दीपक मिस्तरी, रुग्ण, धुळे

आपल महानगर / My महानगर’चे पाच प्रश्न

  • मिस्तरी यांना नेमक्या कशाच्या आधारावर तीन महिने आधी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले?
  • शस्त्रक्रियेसाठी उपकरणे नव्हती तर तशी पूर्वकल्पना रुग्णास का देण्यात आली नाही?
  • एकाच प्रकारची शस्त्रक्रिया असतानाही दोन रुग्णांच्या शस्त्रक्रियेच्या कालावधीत इतके मोठे अंतर कसे?
  • उशिरा दाखल झालेल्या रुग्णावर शस्त्रक्रियेसाठी वेळेत उपकरणे मिळाली कशी?
  • सिव्हिलचे अधिकारी बीडचे मूळ रहिवासी असल्याने बीडमधील रुग्णाला प्राधान्य दिले का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -