कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या तयारीला सुरवात; लवकरच इच्छुकांच्या मुलाखती

नाशिक : नाशिक शहरातील सर्व काँग्रेस पक्षाचे आघाड्या तसेच विभाग सक्षम करण्याकरता नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे सर्व सहकार्य केले जाईल. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील तसेच विभागातील सक्षम कार्यकर्त्यांना महापालिकेत उमेदवारी दिली जाईल. सर्व विभागांच्या बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांशी लवकरच चर्चा करू असे प्रतिपादन नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केले.

काँग्रेस भवन येथे झालेल्या सर्व आघाडी व विभागाच्या अध्यक्षांच्या बैठकीत त्यांनी आपले मत मांडले.पक्षाच्या सर्व आघाड्या व विभाग हे पक्षाचा कणा आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले तसेच नाशिक शहर काँग्रेस तर्फे लवकरच सर्व विभागांना एकत्र करून काँग्रेस पक्षाचा मेळावा करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व इतर नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा लवकरच घेण्यात येईल अशी घोषणा याप्रसंगी आकाश छाजेड यांनी केली.

या बैठकीस ज्येष्ठ नगरसेविका वत्सलाताई खैरे, नाशिक शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस जावेद इब्राहिम, नाशिक जिल्हा एनएसयुआय चे अध्यक्ष अल्तमश शेख, युवक कांग्रेस राज्य सचिव नितिन काकड़, अनुसूचित जमाती विभागाचे शहराध्यक्ष संतोष ठाकूर, नाशिक शहर ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार, नाशिक शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष किरण जाधव, शहर किसान सेलचे अध्यक्ष संतू पाटील जायभावे,सोशल मीडिया महिला विभागाच्या शहराध्यक्ष जुली डिसूजा, नाशिक शहर भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष शरद बोडके, महिला अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षा समीना पठाण, कार्याध्यक्ष साजिया शेख,शहर अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष दाऊद शेख, शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर अमृत सोनवणे, सेवादल मध्य नाशिक अध्यक्ष संतोष हिवाळे, विज्ञान तंत्रज्ञानचे शहर अध्यक्ष पवन भगत, सोनाली बोडके आदि उपस्थित होते.