महापालिका अधिकारी लॉकडाऊन; भाजप नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

वादग्रस्त ठेक्याचा मुद्दा ऐरणीवर, मुकेश शहाणे यांनी लॉक लावत केला कारभाराचा निषेध

वारंवार तक्रार करूनही विद्युत विभागाने दिलेल्या वादग्रस्त ठेक्याची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आज सायंकाळी महापालिकेच्या राजीव गांधी भवनातल्या विद्युत विभागालाच टाळं ठोकलं.

विद्युत पोल दुरुस्तीसंदर्भातला ठेका देत असताना विद्युत विभागाने आपल्या मर्जीचा ठेकेदार निवडला. ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप शहाणे यांनी केला होता. स्थायी समितीच्या बैठकीतही त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, तीन वेळा स्मरणपत्र देऊनही याकडे डोळेझाक करण्यात आली. या प्रकाराच्या निषेधार्थ आज सायंकाळच्या सुमारास राजीव गांधी भवनात येत मुकेश शहाणेंनी थेट विद्युत विभागालाच टाळं ठोकलं. या प्रकारामुळे शहर अभियंत्यांसह कर्मचारीही काही वेळ कोंडले गेले होते.