Ganeshotsav 2021: गणेश विसर्जनासाठी पालिकेची जय्यत तयारी

जीवरक्षक,आरोग्य व नियंत्रण कक्ष, निर्माल्य कलश, फ्लड लाईट, अग्निशमन दल सुविधा

Ganeshotsav 2021: गणेश विसर्जनासाठी पालिकेची जय्यत तयारी

कोरोनासारख्या महामारीच्या संकटात सापडलेल्या गणेश भक्तांना आधार देणाऱ्या, बुद्धीदाता,विघ्नहर्ता श्रीगणेशाचे दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिनी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन आतापर्यंत तरी निर्विघ्नपणे पार पडले आहे. आता अनंत चतुर्दशी दिनी म्‍हणजेच १९ सप्‍टेंबर रोजी दहा दिवसांच्या श्रीगणेश मूर्तीला गणेश भक्त, गणेश मंडळे भावपूर्ण वातावरणात व विधिवत पूजाअर्चा करून नैसर्गिक व कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी निरोप देणार आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल, संबंधित अतिरीक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या आदेशाने, उप आयुक्त (परिमंडळ – २) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने, गणेश मूर्ती विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली आहे. यासंदर्भातील माहिती पालिका जनसंपर्क विभागाचे प्रमुख अधिकारी तानाजी कांबळे ( प्र.) यांनी दिली आहे.

मुंबईचे गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे गतवर्षीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासाठी काही निर्बंध घातले होते. त्यानुसार यंदाही या निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. कोरोना नियमांचे पालन करून म्हणजे सुरक्षित अंतर राखणे, सतत हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर अधुनमधून करणे आदी नियमांचे पालन करून गणेश भक्तांना घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पालिकेने केलेली व्यवस्था

मुंबई महापालिकेने दहा दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनासाठी शहर व उपनगरे येथील सर्व २४ विभागांमध्ये साधारणपणे २५ हजार कामगार – कर्मचारी – अधिकारी यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती उप आयुक्त हर्षद काळे यांनी दिली आहे. कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदा देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे देखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त पालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळीही विसर्जनासाठी व्यवस्था असणार आहे.

मुंबईतील गिरगाव, दादर, माहिम आदी चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्‍थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किना-यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत, यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच, विविध ठिकाणी ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन

कोरोनाच्या कालावधीत विसर्जनाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तिंनी ‘कोविड-१९’ या रोगाच्‍या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.