घर उत्तर महाराष्ट्र डीजेला बंदी, पारंपारिक वाद्यांना परवानगी; गणेश मंडळे अन् पोलिसांची बैठक

डीजेला बंदी, पारंपारिक वाद्यांना परवानगी; गणेश मंडळे अन् पोलिसांची बैठक

Subscribe

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नाशिक शहरात गणेशोत्सवात डीजेला बंदी कायम असून, सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. मंडळांनी मंडप उभारणी करताना वाहतुकीला अडथळा करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले. शहरात १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सव सौहार्दपूर्ण वखेळीमेळीच्या वातावरणात साजरा व्हावा, नागरिकांना उत्सवात उत्सफूर्तपणे सहभाग घेता यावा व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरुवारी (दि.३१) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भिष्मराज हॉल, पोलीस मुख्यालय येथे विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी आमदर देवयानी फरांदे, शहरातील विविध कार्यालयाकडील महापालिका विभाग, विदयुत वितरण विभाग, नाशिक ट्रान्सपोर्ट, कर विभाग, जलतरण विभाग, मनपा विभागीय कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आरटीओ कार्यालय, कॅन्टोमेंट बोर्ड, दूरसंचार विभाग, एम.एस.ई.बी., एस. टी. महामंडळ, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, समादेशक होमगार्ड, नागरी संरक्षण दल, बांधकाम विभाग, अग्निशमन, प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हा माहिती व प्रसिध्दी अधिकारी, शासकीय कार्यालयाकडील अधिकारी, नाशिक शहर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह शहरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, गणेश उत्सव शांततेत पार पडावा, उत्सवाला कोठेही गालबोट लागू नये, याकरीता शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना मंडप उभारणीदरम्यान कोणालाही त्रास होणार नाही व वाहतुकीला अडथळा होणारी नाही, याबाबत दक्षता घ्यावी. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे.
सार्वजनिक गणेश मंडळांना निर्देशीत नियमावलीचे पालन करून बक्षिस मिळविणेकरीता प्रोत्साहित केले. मंडळात स्थापन करण्यात आलेल्या गणेशमूर्ती व परिधान करण्यात येणारे दागिने यांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक, सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.

गणेशोत्सवादरम्यान करण्यात येणारी सजावट व दाखविण्यात येणारी चित्रफीत यामुळे कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुःखावणार नाहीत याबाबात काळजी घ्यावी. गणेशमूर्ती प्रतिष्ठापणा करताना शहरातील विविध कार्यालयांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करावे. आमदार देवयानी फरांदे यांनी सर्व विभागांना त्याच्यांवर असलेल्या जबाबदारीचे पालन करून गणेशोत्सव शांततेने पार पाडण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सूचित केले.

- Advertisement -

बैठकीदरम्यान गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य यांनी उत्सवादरम्यान तसेच गणेश विसर्जन दरम्यान उदभवणार्‍या अडचणी सांगून मिरवणूक मार्गावरील इलेक्ट्रीक तारा काढणे, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, एक खिडकी योजना चालू करणे, रजिस्ट्रर्ड मंडळाला बंदोबस्त देणे, रस्त्यातील पडलेले पाईप बाजूला करणे, रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा बंदोबस्त करणे याबाबत तक्रारी सादर केल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तक्रारीचे निरसन करण्यासाठी संबंधित विभागाचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. विविध कार्यालयाकडील अधिकारी यांनी गणेशोत्सवादरम्यान करण्यात येणार्‍या कामकाजाची माहिती दिली. यावेळी गजानन शेलार, गणेश बर्वे, लक्ष्मण धोतरे, सत्यम खंडाळे, बबलू परदेशी, मंगेश मालपाठक आदी उपस्थित होते. महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. सहायक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांनी आभार मानले.

 मंडळांच्या मागण्या

  • सार्वजनिक गणेश मंडळांच्या परवानगीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन एक खिडकी योजना सुरु करावी.
  • महापालिकेने कर न आकारता मंडळांना परवानगी द्यावी.
  • गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात यावा.
  • शेवटचे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरु ठेवावेत. त्यानंतर साऊंड सिस्टीम बंद ठेवून देखावे सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी.
  • मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढावे. डीजेला परवानगी द्यावी.
  • बी. डी. भालेकर मैदानावर पाळणे, खेळणीस परवानगी देवू नये. या ठिकाणी चोरी व दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असेल.
  • गणेश विसर्जन व ईद जुलूस एकत्र आला तरी सर्वधर्म समभाव ठेवून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
- Advertisment -