घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रीय क्रीडा दिनविशेष : अद्ययावत प्रणालीमुळे नाशिकच्या क्रीडाविकासाला ‘सुवर्ण’ कोंदण

राष्ट्रीय क्रीडा दिनविशेष : अद्ययावत प्रणालीमुळे नाशिकच्या क्रीडाविकासाला ‘सुवर्ण’ कोंदण

Subscribe

जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांच्या प्रयत्नांतून अ‍ॅप, संकेतस्थळ विकसीतग्रामीण, अतिदुर्गम भागातील खेळाडूही झाले अपडेट

आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानेही कात टाकत अद्ययावत प्रणालीवर भर देत खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांसाठी स्वतंत्र अ‍ॅप, तथा संकेतस्थळ विकसीत केले असून, या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा आणि पुरस्कारार्थींचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या पन्नास वर्षातील आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत नाशिकच्या 56 व्यक्तींना मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. मात्र यातील 24 पुरस्कारार्थी हे गेल्या दोन वर्षातील आहेत. यावरून क्रीडा अधिकारी कार्यालयाने राबवलेल्या नवनवीन संकल्पना, उपक्रम आणि खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षकांच्या एकत्रित विचारातून जिल्हा क्रीडा विकासाचा आलेख वेगाने उंचावत असल्याचे अधोरेखित होत आहे. आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ‘हायटेक’ कार्यप्रणाविषयी हा आढावा….

नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सातत्यपूर्ण कामगिरीतून राज्यभरात आपला दबदबा कायम ठेवला आहे. खेळाडूंच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम आणि स्पर्धांच्या आयोजनातून नाशिक कार्यालयाने भरारी घेतली असून, आदिवासी पाड्यांवर तसेच अतिदुर्गम भागातील गुणवत्तेचा शोध घेण्याची महत्त्वाची मोहीमही कार्यालयाकडून राबवली जात आहे. त्यातून आजवर अनेक आदिवासी खेळाडूंनी शहरी भागासह राज्यभरात नाव उंचावले आहे. हे सर्व होत असताना दुर्गम भागातील खेळाडूंना शहरापर्यंत आणि शहरातील क्रीडा अधिकारी, संघटकांना त्या खेळाडूंपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी उद्भवतात. याचाच विचार करून जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी स्वतंत्र अ‍ॅप विकसीत केले, ज्याद्वारे आजघडीला शेकडो खेळाडूंना आपल्या मोबाईल वा संगणकाच्या माध्यमातून शासकीय योजना, पुरस्कार, स्पर्धा, अन्य उपक्रमांची माहिती व त्याचा तपशील क्षणाधार्त मिळवणे शक्य होत आहे.  http://www.nashiksports.com  या संकेतस्थळामार्फत खेळाडूदेखील ‘हायटेक’ झाले असून DSO Nashik नावाने गुगल प्लेवर असलेल्या अ‍ॅप्लिकेशनच्या वापरातूनही खेळाडूंना लॉग-ईन करून विविध तपशील मिळवणे त्याचा अभ्यास करणे शक्य होत आहे. परिणामी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वा शासनाच्या माध्यमातून होणार्‍या विविध स्पर्धा वा उपक्रमांचे वेळापत्रक, ठिकाण आदी माहितीचे नोटिफिकेशन्सही त्यांना उपलब्ध होत आहे.

- Advertisement -

ज्याद्वारे सहभागाची संधीही या खेळाडूंना उपलब्ध होत आहे. केंद्र तसेच राज्य शासन क्रीडा विभागासाठी असलेले विविध पुरस्कार तसेच त्यासाठीचे निकष यांची माहिती संकेतस्थळावर अपडेट केली जाते. त्योतून जिल्हा क्रीडा कार्यालय विशिष्ट अर्ज खेळाडूंकडून मागवू शकते. ती पुढे शासन दरबारी पोहोचते. या पारदर्शी तसेच अद्ययावत प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त संख्येने योग्य त्या खेळाडूंची शिफारस होऊन त्यांना पुरस्कार प्राप्त होऊ शकतात, हे महत्त्वाचे.

शासनाने राज्यभरात उभारलेल्या अकरा क्रीडा प्रबोधिनींपैकी एक असलेल्या नाशिकच्या प्रबोधिनीत आजघडीला आदिवासीबहुल भागातील 24 व अन्य खेळाडू नियमित सराव करतात, त्यांच्या निवास व इतर खर्चाची व्यवस्था शासनाकडूनच होते. या खेळाडूंना सराव, प्रशिक्षक तसेच इतर सुविधाही पुरवल्या जातात. त्यांच्यातील गुणवत्तेला अधिकाधिक वाव मिळावा, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातत्याने प्रयत्नशील असून, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या पुढाकाराने नाशिकच्या क्रीडा विकासाचा वेग अधिक वेगावल्याचे आजवरच्या आकडेवरीवरून सिद्ध होते.

- Advertisement -

खेळ आणि स्पर्धांची वैधता पडताळा

सर्व क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, पालकांनी कुठल्याही खेळाचा सराव करण्यापूर्वी त्या खेळाला मान्यता आहे का, तसेच त्या खेळात करिअरसाठी शासकीय सुविधा मिळतील का, ज्या स्पर्धेत सहभाग घेत आहोत, त्या स्पर्धा आयोजक संघटनेला मान्यता आहे का, याबाबत पडताळणी करणे अत्यंत गरजेचे असते. खेळाडू, प्रशिक्षकांसह पालकांनीदेखील यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल, जेणेकरून खेळाडूंचे होणारे नुकसान टळू शकेल. – रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

क्रीडा महोत्सवांची आज रंगत

जिल्हा क्रीडा विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 29) विशेष क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पारंपरिक खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोट्या, लगोरी, भोवरा आदी प्रकारच्या खेळांचा समावेश असेल. आपल्या मातीशी जुळलेल्या खेळांचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केल्याचे क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -