घरमहाराष्ट्रनाशिकवीजबिल थकले; पंचवटीतील रविवार कारंजा बंद!

वीजबिल थकले; पंचवटीतील रविवार कारंजा बंद!

Subscribe

कारंजा आणि विद्युत रोषणाई बंदच असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त

स्वप्निल येवले 

हिरावाडी: शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरातील आकर्षक कारंजा मोठ्या कालावधीनंतरही बंदावस्थेतच असल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. खासगी कंपनीला हा कारंजा देऊनही त्याची योग्य निगा राखली जात नसल्याने, तसेच त्यातील कारंजा आणि विद्युत रोषणाई बंदच असल्याने नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. मुळात, येथील पाण्याची मोटारच चोरीला गेल्यामुळे अन् वीजबिल भरले जात नसल्याने कारंजाच्या दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. यातून प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे अधोरेखित होते.

- Advertisement -

नाशिक शहराची पहिली ओळख ही कारंजे आणि उद्याने होती. कालांतराने ही ओळख पुसत गेली अन् केवळ ओसाड वाहतूक बेट तसेच उद्यानाच्या भोवती अतिक्रमणांचे जाळे विस्तारलेले बघावयास मिळत आहे. पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, मुंबई नाका आणि शालिमार या मुख्य चौकांमध्ये मोठ मोठे कारंजे आणि त्याला रंगीबेरंगी विद्युत रोषणाई हे सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरायचे. यामुळे परिसरात वेगळीच प्रसन्नता वाटायची. मात्र, हे चित्र फार काळ टिकले नाही. सध्या शहरातील अनेक वाहतूक बेटांमध्ये मनपाच्या वतीने नळ जोडणी केलेली आहे. त्या नळ जोडणीचा वापर फक्त वाहतूक बेट स्वच्छ करणे किंवा सुशोभीकरणासाठी केला जात असल्याने या नळाचा उपयोग आजूबाजूला अतिक्रमण करत खाद्य पदार्थांच्या हातगाडी लावणार्‍या व्यावसायिकांकडून केला जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. यामुळेच या वास्तूंची दूरवस्था होत असल्याच्या तक्रारीही आता वाढू लागल्या आहेत.

आम आदमी पक्षाने नाशिक शहराची ओळख असलेला रविवार कारंजा पुन्हा सुरु व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु केले आणि ३ नोव्हेंबरला त्यांनी नाशिक महापालिकेचे पश्चिम विभागीय अधिकारी एम. टी. हरिश्चंद्र यांना निवेदन देत ८ दिवसांत कारंजा सुरु करण्याची मागणी केली. रविवार कारंजा हा मोठा आणि खोल असल्याने त्याच्यात पावसाळ्यात पाणी साचून योग्य निचरा न झाल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आणि इतर साथीचे आजार पसरत गेले. या संदर्भात आपने निवेदन देत प्रशासनाला जाग आणून दिली. या निवेदनाची दखल घेत मनपा प्रशासनाने कारंजाची साफसफाई केली खरी परंतू रविवार कारंजा हा संदीप फाऊंडेशन यांना प्रायोजक तत्वावर दिला असल्याने तो सुरु करणे हे काम मनपाचे नसल्याचे विभागीय अधिकार्‍यांकडून सांगितले गेले. यामुळे पुन्हा एकदा कारंजाची दुरवस्था होऊन प्रशासकीय उदासीनतेमुळे त्याच्या जतनाचा प्रश्न उभा ठाकला.

- Advertisement -

शहरातील मनपाच्या मालकीच्या अनेक वास्तूंची आजघडीला मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत असून अनेक गोष्टी चोरीस जात असल्याने जनतेच्या पैशांचा चुराडा करण्याचे काम सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. रविवार कारंजावरील पाण्याची मोटार चोरीला गेली तेव्हा पोलिसांत तक्रार दाखल केली गेली, मात्र सर्वच बाबींत असे होताना दिसत नाही. त्यामुळे नागरी सुविधांमध्ये कमतरता जाणवत आहेत. मुंबई नाका येथील वाहतूक बेट सद्यस्थितीत आदर्श ठरत आहे. येथील कारंजा आणि विद्युत रोषणाई सातत्याने प्रसन्न करत आहे. अन्य खासगी संस्थांनीही अटी -शर्थींचा भंग केल्यास नागरी हिताचा विचार करून त्यांच्यासंदर्भात तातडीने निर्णय व्हावा, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

जनतेचे आरोग्य धोक्यात आले होते. कारंजात साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी रविवार कारंजाचे नामकरण करत डेंग्यू कारंजा केले होते. तरीदेखील ढिम्म पालिका प्रशासन जागे झाले नाही. शेवटी ८ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर प्रशासनाने साफसफाई केली.

                                                  – जितेंद्र भावे, कार्याध्यक्ष, आप

मनपा आणि संस्थेत झालेल्या करारनाम्यानुसार देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संदीप फाऊंडेशनची तर वीजपुरवठा आणि त्याचे देयके अदा करण्याची जबाबदारी महापालिकेची असे ठरलेले आहे. कारंजा बंद स्थितीत असल्याने तिथे करण्यात आलेली विद्युत उपकरणे आणि कारंजाची मोटार चोरीला गेली आहे. तशी रीतसर तक्रार पोलिसांकडे दाखल केलेली आहे.
                                                                 – दिलावर एस. एफ., प्रोजेक्ट इंजिनिअर, संदीप फाऊंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -