घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रExclusive : धाडोशीत जलजीवन मिशनचा फज्जा; निकृष्ट कामांमुळे गाव तहानलेलेच

Exclusive : धाडोशीत जलजीवन मिशनचा फज्जा; निकृष्ट कामांमुळे गाव तहानलेलेच

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धाडोशी गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना जलजीवन मिशन योजनेंतर्गत ठेकेदाराने केलेले काम चर्चेचा विषय ठरला असून ठेकेदाराने अक्षरशः शासनाच्या डोळ्यात धुळफेक केल्याचे दिसून येत आहे. पाईपचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे काम करून वर्ष झाले तरी देखील धाडोशी हे गाव तहानलेलेच असल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याने नेमकी ही योजना कोणासाठी आहे याबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. दरम्यान प्रशासनाचे या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने ही योजना यशस्वी होईल का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावात पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलजीवन मिशन योजनेकडे बघितले जाते. मात्र असे असतानाही काही ठेकेदारांनी या योजनेचा अक्षरश: फज्जा उडवल्याचे दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धाडोशी या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष होते. पाणी भरण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने केवळ एका बोरवेलमधून संपूर्ण गावाची तहान भागवली जात आहे. २-२, ३-३ दिवस गावाला पाणी मिळत नाही उन्हाळ्यात पाणी मिळवण्यासाठी महिलांना मोठी वणवण करावी लागते. रात्री अपरात्री उठून पाणी भरावे लागते. पाण्यासाठी अक्षरशः पायपीट करावे लागते.

- Advertisement -

जंगली श्वापदांची भीती असताना देखील जीव मुठीत धरून महिलावर्ग पाणी मिळवण्यासाठी धडपडत असतात. असे असताना केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे गावात पाण्याचा प्रश्न सुटणार होता, मात्र कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याने आदिवासी जनतेच्या भावनांचा अक्षरशः खेळ झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाईपलाईनचे काम करण्यात आले, मात्र पाईपलाईनचे काम शासन नियमाला धरून नसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाईप टाकताना किमान तीन फूट खोल जमिनीत पाईप टाकण्याची शासनाचे स्पष्ट निर्देश असताना ठेकेदाराने काही ठिकाणी केवळ जमिनीवर पाईपलाईन केल्याचे दिसून येत आहे. टाकलेले पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वरच्यावर पाईप टाकल्याने ते तुटण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसत आहे. सुरुवातीचे दोन महिने गावकर्‍यांना पाणी मिळाले मात्र त्यानंतर अजूनही पाणी मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता असून प्रशासनाच्या अनास्थेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

या कामा संदर्भात कार्यारंभ आदेश डिसेंबर 2022 मध्ये मिळाल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. मात्र त्यापूर्वीच काम कसे केले? हा प्रश्न निरुत्तरित आहे. योजनेच्या कामाच्या ठिकाणी फलक लावणे बंधनकारक असताना धाडोशी येथे केलेल्या कामांचे कुठलेही फलक लावले नसल्याचे दिसून येत आहे. धाडोशी गाव हे त्रंबकेश्वर पासून हाकेच्या अंतरावर असताना प्रशासनातील एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलाच नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अधिकारी देखील ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. तब्बल 47 लाख रुपयांचे काम करूनही गावाला पाण्याचा एक थेंब मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, कामाचे बिल काढण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असून एकूणच धाडोशी गावात ठेकेदार, अधिकारी तुपाशी आणि गावकरी मात्र उपाशी अशी गत बघायला मिळत आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात पाईपलाईनच्या काम करण्यात आले. सुरुवातीचे १-२ महिने गावाला पाणी मिळाले, मात्र त्यानंतर पाणी कधीही मिळाले नाही. : भाऊराव गुंड, ग्रामस्थ

धाडोशी गावात पाण्याची मोठी समस्या आहे. आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पाण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र त्याची कुठेही दखल घेतली जात नाही. या कामाच्या बाबतीत ग्रामस्थांमध्ये साशंकता असून, या कामाची सखोल चौकशी करावी. : सीताराम झाले, ग्रामस्थ

प्रशासन स्थानिक पातळीवर विश्वासात घेत नाही. त्यामुळे कोण कुठले काम करते हे समजत नाही. जलजीवन मिशन अंतर्गत वर्षभरापासून काम सुरू आहे. मात्र गावाला पाणी मिळत नसल्याने गावकर्‍यांचे अतोनात हाल होत आहेत. : अशोक गवारी, सरपंच, धाडोशी

धाडोशी येथे केलेल्या कामांची पाहणी केलेली नाही. ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. : डी.एल. अंधारे, उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -